कोल्हापूर : भारतीय फुटबॉल महासंघ व वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन देश व राज्यातील खेळाडूंची नोंदणी आॅनलाईन पद्धतीने करते. याच धर्तीवर कोल्हापुरातील १६ संघांतील खेळाडू व संघ व्यवस्थापन आणि प्रशिक्षकांची नोंदणी आॅनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनने घेतला आहे. त्यानुसार आज, बुधवारी संघांच्या सर्वेसर्वांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.जगाच्या कानाकोपऱ्यातील माहिती नेटीझन्सना आता एका क्लिकवर मिळत आहे. यात क्रीडाक्षेत्रही मागे नाही. क्रीडा संघटना देशपातळीवरील असो वा राज्य पातळीवरील असो; त्यातील खेळाडूंची नोंदणीही आॅनलाईन पद्धतीने होत आहे. काळाच्या ओघात संगणकीय प्रणाली कास धरत पंचाहत्तरी ओलांडलेली ‘कोल्हापूरची तिसरी फुटबॉल पंढरी’ म्हणून देशभरात प्रसिद्ध असलेल्या ‘कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशन’नेही आपल्या क्षेत्रातील खेळाडूंची नोंदणी आॅनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदापासून खेळाडूंना नोंदणीकरिता शाहू स्टेडियमवरील ‘के.एस.ए.’ कार्यालयाच्या बाहेर रांगा लावाव्या लागणार नाहीत.
यात खेळाडूंची संपूर्ण माहिती आॅनलाईन अर्जाद्वारे भरून घेतली जाणार आहे. यात कोल्हापुरातील १६ संघांचे २० खेळाडू आणि अध्यक्ष, उपाध्यक्ष, संघ व्यवस्थापक, सहायक संघ व्यवस्थापक आणि प्रशिक्षक अशा ४०० जणांची नोंदणी आॅनलाईन पद्धतीने प्रथमच करून घेतली जाणार आहे. याकरिता आज, बुधवारी १६ संघांतील संघ व्यवस्थापन करणाऱ्या प्रतिनिधींना प्रशिक्षणाकरिता ‘के.एस.ए.’ने पाचारण केले आहे.या खेळाडूंची नोंदणी आॅफलाईनचजिल्ह्याबाहेरील व नवीन खेळाडूंची नोंदणी संघांना कार्यालयातच येऊन करावी लागणार आहे; कारण मागील वर्षातील नोंदणी केलेल्या खेळाडूंनाच यंदा आॅनलाईन पद्धतीने नोंदणी करता येईल, अशी संगणकीय प्रणाली तयार करण्यात आली आहे. पुढील वर्षापासून सर्वच खेळाडूंची नोंदणी आॅनलाईन पद्धतीने होणार आहे.या संघांची नोंदणी होणारशिवाजी तरुण मंडळ, प्रॅक्टिस क्लब (अ), पाटाकडील तालीम मंडळ (अ) व (ब), दिलबहार तालीम मंडळ (अ), बालगोपाल तालीम मंडळ, संध्यामठ तरुण मंडळ, खंडोबा तालीम मंडळ (अ) व (ब), फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ, बी. जी. एम. स्पोर्टस, संयुक्त जुना बुधवार तालीम, उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम, ऋणमुक्तेश्वर तालीम, मंगळवार पेठ फुटबॉल क्लब, कोल्हापूर पोलीस संघ या १६ संघांचा समावेश आहे.
कोल्हापूरच्या फुटबॉल क्षेत्राला नवसंजीवनी देण्यासाठी आॅनलाईन नोंदणी ही महत्त्वाची बाब आहे. नव्या हंगामात या सोबतच खेळाडूंना स्वयंशिस्त व आचारसंहितेचे धडेही द्यावेत.- सतीश सूर्यवंशी, अध्यक्ष, खंडोबा तालीम मंडळ फुटबॉल संघ