कोल्हापूर : स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या अमलीविरोधी पथकाने सोमवारी वडगाव हद्दीतील पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर एका युवकाकडून १६ किलो गांजासह दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला. प्रतिक ऊर्फ सोन्या संजय यादव (वय २०, रा. गोळेवाडी (ता. कोरेगाव, सातारा) असे संशयिताचे नाव आहे.पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कोरेगाव (सातारा) येथील एक युवक कोल्हापुरात गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना खबऱ्याकडून मिळाली. त्यानुसार पेठवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुणे-बेंगलोर महामार्गावर घुणकीच्या पुलाखाली सापळा रचला.त्यानुसार एक पांढऱ्या रंगाची दुचाकी घेऊन एक युवक आला. त्यास पकडून त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने आपले प्रतीक ऊर्फ सोन्या यादव असे सांगितले. त्याच्याकडे १६ किलो १५० ग्रॅम गांजा मिळाला. यासह त्याच्याकडून दुचाकी व मोबाइल असा २ लाख १६ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, सहायक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले, पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे, अंमलदार श्रीकांत मोहिते, विजय कारंडे, कुमार पोतदार , महेश गवळी, किरण गावडे, वैभव पाटील, प्रदीप पोवार, उत्तम सडोलीकर, अनिल जाधव, राजेंद्र वराडकर यांनी केली.