लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कळंबा कारागृहाच्या आतमध्ये ज्यादिवशी दहा मोबाईल व गांजा व अन्य साहित्य भिंतीवरून आत टाकण्यात आले, त्यादिवशी व त्या घटनेअगोदर दोन दिवस सर्कल क्रमांक एकमधील कैद्यांच्या संपर्कात असलेले व तटबंदीवर बंदोबस्तास असलेल्या पाच अधिकाऱ्यांसह सोळा कर्मचाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कळंबा कारागृहाच्या पूर्वेकडील भिंतीवरून काही अज्ञातांनी दहा मोबाईल, गांजा, मोबाईल काॅड, पेन ड्राईव्ह आदी साहित्य गुंडाळी करून आत फेकले. ही बाब तुरुंग प्रशासनाने गांभीर्याने घेतली. त्यामुळे शुक्रवारी स्वत: अपर पोलीस महासंचालक (तुरुंग प्रशासन) सुनील रामानंद, पुणे विभागीय तुरुंग उपमहानिरीक्षक योगेश देसाई जातीनिशी कळंबा कारागृहात आले. त्यांनी दिवसभरात या घटनेच्या अगोदरचे दोन दिवस सर्कल क्रमांक एकमधील कैद्यांच्या संपर्कात कोणकोणते कर्मचारी, अधिकारी आले, त्यासोबतच तटबंदीवरील बंदोबस्तावर असलेले कर्मचारी आणि हजेरी मास्तर असे ५ अधिकारी, अकरा कर्मचारी अशी सोळाजणांची सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजवरून नावे स्पष्ट झाली आहेत. या सर्वांची या प्रकरणाच्या अनुषंगाने चौकशी केली जाणार आहे. हे फुटेज उपमहानिरीक्षक देसाई यांनी ताब्यात घेतले आहे. त्यावरून अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली जाणार आहे. चौकशीत जे दोषी आढळतील त्यांच्यावर खात्याअंतर्गत निलंबनासह बडतर्फीचीही कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तत्पूर्वीच शुक्रवारी सकाळी कळंबा कारागृहाचे अधीक्षक शरद शेळके यांची उचलबागडी करून त्यांना पुणे येथील येरवडा कारागृहातील मुख्यालयात धाडण्यात आले. यापूर्वीही २०१९ मध्ये वाईतील सिरिअल किलर संतोष पोळ याची पिस्तूल क्लिप व्हायरल झाली होती. त्या प्रकरणातही शेळके निलंबित झाले होते. त्या प्रकरणात त्यांना क्लीन चिट देऊन पुन्हा हजर करून घेण्यात आले होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी झालेल्या या प्रकरणाची नोंद तुरुंग प्रशासनाने गांभीर्याने घेतल्याने कारागृहातील कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.