अमर पाटील कळंबा : महापालिका क्षेत्रातील मूलभूत सोयीसुविधाच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेअंतर्गत मिळालेल्या साठ लाखांच्या विकासनिधीतून प्रभाग ७४ सानेगुरुजी वसाहत येथील सूर्यवंशी कॉलनीमधील पालिकेच्या खुल्या आरक्षित जागेवर उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक सोयीसुविधांयुक्त भाजीमंडईचे काम पूर्णत्वास येत असून, लवकरच लोकार्पण सोहळ्यानंतर प्रारंभ करण्यात येणार आहे
दक्षिणेच्या उपनगरात आपटेनगर जीवबा नाना पार्क कणेरकर नगर रंकाळा तलाव सुर्वेनगर राजलक्ष्मीनगर रिंगरोड या प्रभागातील नागरिकांसाठी स्वतंत्र भाजीमंडई विकसित झालीच नसल्याने पदपथावर ठाण मांडून बसलेल्या किरकोळ विक्रेत्यांकडून नागरिकांना भाजीपाला फळे खरेदी करावी लागत होती ग्राहकांनी रस्त्याकडेस लावलेल्या वाहनांमुळे वाहतूककोंडी, किरकोळ अपघात, वादावादी नित्याची बनली होती.
काही वर्षांपूर्वी या ठिकाणी आरक्षित जागेवर पालिकेमार्फत दर्जेदार भाजीमंडई उभारण्यासाठी नगरसेवक शारंगधर देशमुख यांनी प्रयत्न केला होता. प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे काम रखडल्यानंतर रस्त्यावरच्या भाजीमंडईस आळा बसवा यासाठी बांधा, वापरा, हस्तांतरित करा पर्याय त्यांनी प्रशासनापुढे ठेवला. निविदा प्रक्रिया राबवूनसुद्धा प्रतिसाद मिळाला नाही. २०१३ साली पाच लाखांचा विकासनिधी खर्चून मंडई विकसित करण्यात आली; पण निवाऱ्यासह अन्य मूलभूत सुविधांची वानवा असल्याने मंडई विकसित झालीच नाही
आता मात्र सानेगुरुजी वसाहत प्रभागात उभारण्यात आलेल्या ६० लाखांच्या भव्य भाजीमंडईमुळे विक्रेत्यांची एकाच छताखाली सोय होणार असल्याने नागरिकांची गैरसोय होणार नाही, शिवाय उपनगरांत पदपथ मोकळा श्वास घेतील. या मंडईत सुमारे ७२ भाजीपाला फळे विक्रेत्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली असून, पार्किंग, स्वच्छतागृहे, हायमास्ट पथदिवे, पिण्याच्या पाण्याची व कचरा व्यवस्थापनाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ज्यामुळे आता एकाच छताखाली भाजीपाला, फळे उपलब्ध होणार असल्याने ग्राहकांची चांगली सोय होणार आहे.
प्रतिक्रिया नगरसेविका मनीषा कुंभार
उपनगरात दर्जेदार भाजीमंडई विकसित व्हावी यासाठी केलेल्या पाठपुराव्यास यश आले असून, पदपथावरील अतिक्रमणे दूर होऊन रस्ते मोकळा श्वास घेतील याचे योग्य व्यवस्थापन प्रशासनाने करणे गरजेचे आहे.
फोटो मेल केला आहे
फोटो ओळ
प्रभाग ७४ सानेगुरुजी वसाहत येथील सूर्यवंशी कॉलनीतील पालिका आरक्षित जागेवर उभारण्यात येणाऱ्या साठ लाखांच्या अत्याधुनिक सुविधांनी युक्त भाजीमंडईचे काम पूर्णत्वास गेले आहे.