सचिन भोसले- कोल्हापूर -‘मेथी’ची भाजी म्हटले की, त्यातील कडवटपणा लगेच समोर येतो; पण तिच्यातील शरीराला पोषक ठरणारे घटक लक्षात येत नाहीत. मेथीच्या भाजीला मानवी शरीरास लागणाऱ्या जीवनसत्त्वांची खाण म्हटले तर वावगे ठरणार नाही. १०० ग्रॅम मेथीपासून शरीरास ५० कॅलरी इतकी ऊर्जा मिळू शकते. मेथीच्या पानांची भाजी जशी प्रसिद्ध, त्याप्रमाणेच मेथीच्या दाण्यांचा मोठा उपयोग आहे. मेथी कोलेस्टेरॉल कमी करते, तर रक्तदाब, मधुमेह नियंत्रित ठेवण्याचे मोठे काम करते. इसवी सन पूर्व ४००० वर्षांपासून मेथीचा मानवी आहारात वापर होत आहे. मूर्ती लहान आणि किर्ती महान असा मेथीला लौकिक आहे. अशा मेथीचे महत्त्व जाणून घेऊ ‘लोकमत’संगे.मेथीचे उपयोगमेथीच्या ओल्या व सुक्या पानांचा वापर केला जातो. मेथीच्या बिया म्हणजेच मेथ्या किंवा मेथी दाणे यांचा वापर मसाल्यांमध्ये केला जातो. ओल्या मेथीचा वापर भाजीसाठी केला जातो. तसेच मेथीच्या दाण्यांना अंकुर आणून त्यांचीदेखील भाजी केली जाते. कोकणात बहुतेक भागांमध्ये मेथीचे दाणे वाळूमध्ये रुजवून त्यापासून उगवलेल्या पाल्याची भाजी खाल्ली जाते. मेथीची पाने सुकवून त्यांची ‘ कसुरी मेथी’ करून मसाल्यात, जेवणाचा स्वाद वाढविण्यासाठी कुस्करून पदार्थात टाकली जाते. मंद, गोडसर सुवासामुळे मेथीचा वास सर्वांना हवाहवासा वाटतो. मेथीचे दाणे आख्खे भाजून, जाडसर भरडून जेवणात, विविध प्रकारच्या चटण्यांत, लोणच्यांत हमखास वापरले जातात. दक्षिण भारतात सांबर मसाल्यांमध्ये मेथी दाण्यांचा वापर प्रामुख्याने केला जातो. अनेक आर्युवेदिक उपचारात देखील मेथीच्या दाण्याचा उपयोग सांगितला आहे.वाळूत उगवणाऱ्या मेथीला महाराष्ट्रात ‘ समुद्र मेथी’ असे म्हटले जाते. समुद्राच्या वाळूत तसेच भागातील नदीकाठी वाळूमिश्रित मातीतसुद्धा या मेथीची लागवड तसेच उत्पादन घेतले जाते. मेथीच्या पानांचा सॅलडमध्येदेखील वापर केला जातो. टर्कीश खाद्यसंस्कृतीत मेथीची पेस्ट करून, इतर मसाले जसे, जिरेपूड, काळी मिरीपूड यांच्यासोबत एकत्रित करून ‘पार्स्टिमा’ नावाच्या खाद्यपदार्थात वापर केला जातो. पर्शियन खाद्यपदार्थांत मेथी सर्वच पदार्थांत वापरली जाते. इजिप्तमध्ये ‘पेटा ब्रेड’सोबत रोजच्या आहारात मेथीची पेस्ट खातात. इथोपियामध्ये तर मेथीचा वापर ‘डायबिटीस’सारखा आनुवंशिक आजार नियंत्रित करण्यासाठी करतात. ज्यू धर्मातील नूतन वर्षाच्या पहिल्या व दुसऱ्या रात्री मेथीचा वापर रोजच्या आहारात करतात. मेथीची पाने ही विविध जीवनसत्त्वांनी समृद्ध आहेत.ही जीवनसत्त्वे मानवी शरीर सहजरीत्या शोषून घेऊ शकते. १०० ग्रॅम मेथीच्या भाजीपासून शरीरास ५० कॅलरी इतकी ऊर्जा मिळू शकते; तर मेथीच्या दाण्यांपासून ६५ टक्के तंतुमय पदार्थ मिळतात. मेथीच्या दाण्यांमध्ये कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवणारा घटक आहे. याचबरोबर रक्तदाब, साखर व शरीरातील श्वासोच्छ्श्वास सुरळीत ठेवण्यास मेथीची मदत होते. आयुर्वेदातही मेथीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. सुजलेल्या स्नायू, पोटदुखी, गॅसेस, हृदयाच्या धमन्यांचे आजार, हर्बल चहा यांमध्ये मेथीचा वापर केल्यास आराम मिळतो; तर केसांचे गळणे थांबविण्यासाठी मेथी नारळाच्या दुधात घालून वापरली तर त्याचाही उपयोग होतो. चेहऱ्यावरील सुरकुत्या घालविण्यासही मेथीचा वापर केला जातो. याशिवाय औषधी कंपन्या गोळ्यांवरचा कडवटपणा घालवण्यासाठी मेथीच्या दाण्यांचा वापर करतात.मेथीची लागवड अफगाणिस्थान, पाकिस्तान, भारत, इराण, नेपाळ, बांगलादेश, अर्जेंटिना, इजिप्त, फ्रान्स, स्पेन, टर्की, मोरोक्को या देशांत मोठ्या प्रमाणात केली जाते. या सर्वांमध्ये मेथीचे सर्वाधिक उत्पादन घेणारा देश म्हणून भारताकडे पाहिले जाते. त्यात राजस्थान, गुजरात, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, हरियाणा व पंजाब ही राज्ये मेथी उत्पादनात आघाडीवर आहेत.मेथीच्या पानांची भाजी तर सर्वश्रुत आहे. याचबरोबर मेथीच्या दाण्यांचा सर्वाधिक वापर मसाल्यांमध्ये चव वाढविण्यासाठी केला जातो. त्याच्या कडवट पण हव्याहव्याशा वासामुळे मेथीचा वापर अनेक तयार मसाल्यांमध्ये केला जातो. याशिवाय मेथीच्या दाण्यांना मोठी मागणी आहे. सर्वसाधारणपणे मार्च महिन्यात या दाण्यांना मोठी मागणी असते. या दिवसांत मेथी खरेदी केली जाते. कोल्हापुरात दर महिन्याला २० टनांपेक्षा अधिक मेथीची आवक होते, तितकीच ती खपतेही. ही मुख्यत: राजस्थान, मध्य प्रदेश येथून कोल्हापुरात विक्रीसाठी येते. कोल्हापुरात जावडी मेथीला मोठी मागणी आहे.सर्वसाधारणपणे मार्च महिन्यामध्ये शेतकरी वर्गाकडून मेथीला मागणी अधिक असते. यामध्ये जावडी (मध्य प्रदेश ) मेथीच्या दाण्यांना अधिक चव आहे. बाजारात उपलब्ध असणारी भाजी ही जावडा मेथी बियांपासून तयार केलेली असते. त्यामुळे या मेथीला सर्वाधिक मागणी आहे. जिल्ह्यातील ७० टक्के शेतकरी जावडी मेथी खरेदी करतात. याशिवाय मसाल्याचे पदार्थ तयार करणाऱ्या कंपन्याही मेथीचा वापर मसाल्यांमध्ये करीत असतात. त्यामुळे मेथीला मागणी आहे. - चिंतन शहा, घाऊक मसाले व्यापारी
‘मेथी’चा आकार छोटा, उपयोग मोठा--‘लोकमत’संगे जाणून घेऊ
By admin | Published: November 23, 2014 10:55 PM