इचलकरंजी : येथील सायझिंगधारकाने शिरढोण- कुरुंदवाड (ता. शिरोळ) येथील पुलावरून पंचगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. अशोक दत्तोबा मांगलेकर (50, रा. पटेकरी गल्ली, जवाहरनगर) असे त्यांचे नाव आहे. आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याच्या चर्चेने शहरात खळबळ उडाली आहे.
वस्त्रनगरीतील यंत्रमाग व्यवसायाला सध्या विविध समस्या भेडसावत आहेत. त्यातच लॉकडाऊनमुळे हा व्यवसाय पुरता घाईला आला आहे. त्यातून सावरत असताना सूत दरवाढीमुळे यंत्रमागधारक बेजार झाला असून वीज बिल आणि कर्ज वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. यामुळे व्यवसाय कसा करायचा, असा प्रश्न उद्योजकांना सतावतोय. येथील जवाहरनगर परिसरात राहणाऱ्या अशोक मांगलेकर यांनी यंत्रमाग व्यवसायातील नुकसानीमुळे यंत्रमाग विकून सायझिंग व्यवसाय सुरू केला होता. त्यांनी या व्यवसायासाठी कर्ज काढले होते. व्यवसायातील तेजी-मंदीमुळे कर्जाची परतफेड होत नव्हती. मात्र, कर्जासाठी वारंवार तगादा लावला जात असल्याने मांगलेकर हैराण झाले होते. त्यांनी शुक्रवारी (दि.19) रोजी काही मित्रांना ‘मी आता चाललोय’ असा फोनही केला होता.
त्यानंतर शुक्रवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास शिरढोण येथील पुलावरून पंचगंगा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली होती. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शनिवारी सकाळी वजीर रेस्क्यू फोर्सच्या पथकाला पाचारण करण्यात आले. रौफ पटेल यांच्या पथकाने नदीपात्रातील मृतदेह शोधून काढला. कुरुंदवाड पोलिसांनी पंचनामा केला. त्यानंतर कुरुंदवाड येथील शासकीय रुग्णालयात मृतदेहाचे विच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची नोंद कुरुंदवाड पोलीस ठाण्यात झाली आहे. त्यांच्यावर येथील पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. विविध यंत्रमागधारक संघटनांचे प्रतिनिधी व कारखानदार यांनी गर्दी केली होती. मांगलेकर यांच्या पश्चात पत्नी आणि विवाहित मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
चौकट - सुसाइड नोटमध्ये सहा जणांची नावे?
मांगलेकर यांच्याकडे मिळून आलेल्या चिठ्ठीतून आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचे स्पष्ट होत असून त्यामध्ये सराफ, व्यापारी व नातेवाइकासह 6 जणांचा उल्लेख असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. त्यामुळे संबंधितांच्यात खळबळ माजली आहे.