कोल्हापूर : एका माथेफिरूकडून काल, शनिवारी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, संभाजीराजे व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आक्षेपार्ह प्रतिमा फेसबुकवर टाकण्याच्या घडलेल्या प्रकारानंतर कोल्हापुरात झालेल्या उद्रेकाचे आज, रविवारी दिवसभर शहरात पडसाद उमटले. प्रतिमा विटंबनेच्या प्रकरणाचा कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्तपणे व्यापार, दुकाने बंद ठेवून निषेध व्यक्त केला. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिषेक, ‘जय भवानी, जय शिवाजी’चा गजर, कार्यकर्ते व युवकांची गर्दी, असे वातावरण शिवाजी चौकात होते. या घटनेच्या निषेधार्थ काही हिंदुत्ववादी संघटनांनी दिलेली बंदची हाक, नियोजित केलेला मोर्चा या पार्श्वभूमीवर शहरात अनुचित प्रकार घडू नये, तसेच शांतता राहावी, यासाठी शहरातील चौकाचौकांत पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. सकाळी नऊ वाजता शिवाजी चौकातून मोर्चा काढण्याचे नियोजन होते. त्यानुसार काही हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते, युवक याठिकाणी जमू लागले. ते छत्रपती शिवाजी मार्केट, शिवाजी रोड, भेंडेगल्ली रस्ता, भाऊसिंगजी रोड, आदी परिसरांत गटागटाने थांबले होते. त्यामुळे या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, दहा वाजता मोर्चा रद्द केल्याचे जाहीर करण्यात आले, तरीही शिवाजी चौकात कार्यकर्ते, युवक येतच होते. सव्वाअकराच्या सुमारास येथे भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव, युवासेनेचे जिल्हाध्यक्ष हर्षल सुर्वे, गणेश देसाई, संदीप देसाई हे कार्यकर्त्यांसमवेत आले. त्यांनी चौकातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यावर उपस्थितांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या गजराने चौक दणाणून सोडला. तसेच संबंधित माथेफिरूचा निषेध व्यक्त केला. दंगलीत ३० लाखांचे नुकसान; तीसजणांना अटक शनिवारी रात्री झालेल्या दंगलप्रकरणी जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी व शाहूपुरी पोलिसांनी ३० हून अधिकजणांना अटक केली. दंगलीत शहरातील चारचाकी, तीनचाकी व दुचाकी गाड्या अशा सुमारे ३० लाखांच्या मुद्देमालाचे नुकसान झाले. दंगलीत लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक धन्यकुमार गोडसे, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे दिनकर मोहिते, पोलीस उपनिरीक्षक ए. व्ही. मस्के व पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक शिवाजी नवले हे चार पोलीस जखमी झाले. अल्पवयीन मुलांचा समावेश दरम्यान, अटक केलेल्यांमध्ये पाच विधीसंघर्ष बालकांचा (अल्पवयीन) समावेश आहे. या सर्वांना न्यायालयाने एक दिवसाची उद्या, सोमवारपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
कोल्हापुरात कडकडीत बंद तणाव
By admin | Published: June 02, 2014 1:16 AM