प्रवीण देसाई - कोल्हापूर -बलुतेदारांमधील प्रतिभावंत, कुशल तंत्रज्ञ, हरहुन्नरीपणाचा वापर करत लाकूड व लोखंडापासून आखीवरेखीव वास्तुविश्व निर्माण करणारा समाज म्हणून सुतार समाजाची ओळख आहे. ‘जन्मजात अभियंता’ ही ओळख असलेल्या या समाजातील आताची पिढी नवतंत्रज्ञानाची कास धरत आहे. ऐतिहासिक किल्ले, राजवाडे, मंदिरे, लेणी, पालख्या, आदींचे कलाकुसरीचे काम करणाऱ्या या समाजाला पूर्वी राजाश्रय होता. समाजातील कारागिरांनी केलेले कोल्हापुरातील न्यू पॅलेस, जुना राजवाडा, शालिनी पॅलेस, अंबाबाई मंदिर, भवानी मंडप येथील लाकडावरील नक्षीकाम लक्ष वेधून घेते. त्याचबरोबर गावगाड्यातील शेतीसाठी उपयोगी व महत्त्वाची अवजारे, नांगर, कुळव, दिंड, खुरे, बांडगे, कुरी, कोळपे, डोक्याने तसेच बैलाचे जू यांसह ग्रामीण जीवनातील अविभाज्य भाग असलेली बैलगाडी सुतार समाजच करतो. औद्योगिक क्रांतीमुळे बलुतेदारी व्यवस्था कोलमडून गेली. प्रत्येक बलुतेदाराचे व्यवसाय बंद पडू लागले. हाताने करावयाची कामे यंत्रांवर होऊ लागल्याने कामाचा उरक वाढला. कुटुंबातील लोकांची संख्या वाढल्याने काहींनी शहराकडे स्थलांतर केले. या व्यवसायात आता पारंपरिक साधनांबरोबर अत्याधुनिक साधनांचाही वापर सुरू झाला आहे. सुतारकाम आता हाताने रंधा मारण्यापेक्षा रंधायंत्रावर आले. करवतीने लाकूड कापण्यापेक्षा कटर यंत्राचा वापर, हॅँड ग्रॅँडर यंत्र आले. हाताने नक्षीकाम करण्यापेक्षा यंत्रावर नक्षी करता येऊ लागली. यंत्रे वापरून नवनव्या व लाकडी वस्तू तयार केल्या जात आहेत. जिल्ह्यात सुतार समाजाचे दोन लाखांहून अधिक समाजबांधव आहेत. त्यापैकी सुमारे ५० हजार बांधव हे कोल्हापूर शहरात विशेषत: उत्तरेश्वर पेठ, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, राजारामपुरी, आदी परिसरात वास्तव्यास आहे.भावी पिढी शिकून, सुसंस्कारित होऊन हा समाज देशपातळीवर प्रगतिपथावर येईल, यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी सुतार-लोहार समाजातील प्रतिष्ठित लोकांना बोलाविले. त्यांच्यासमोर मुलांच्या शिक्षणासाठी सुतार समाज वसतिगृहाचा प्रस्ताव मांडून तुम्ही कलाकार व जन्मजात अभियंता आहात, तुमच्या समाजासाठी व भावी पिढ्यांच्या उज्ज्वल भविष्याकरिता वसतिगृहाची गरज असल्याचे सांगितले. त्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी १९२१ साली रंकाळा टॉवरजवळ तयार इमारत वसतिगृहाला दिली. या वसतिगृहाचे अध्यक्ष म्हणून शाहू महाराजांनी कलामहर्षी बाबूराव पेंटर यांची नियुक्ती केली. त्यानंतर बाळकोबा रामचंद्र सुतार हे २५ वर्षे अध्यक्ष होते. पांडुरंग मरळकर, पांडुरंग बांदिवडेकर, रवींद्र मेस्त्री, निवृत्ती सातवेकर, शिवाजी सौंदलगेकर, शिवाजीराव सुतार, विष्णुपंत सुतार, धोंडिराम हिरवडेकर, माजी उपमहापौर आनंदराव सुतार, आदींनी या वसतिगृहाच्या संचालक पदावर काम करीत समाजासाठी चांगले कार्य केले. सध्या नारायण सुतार हे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. या वसतिगृहात राहून शिक्षण घेत शेकडो विद्यार्थी बाहेर पडले आहेत. यामधील अनेकजण शासकीय सेवेत मोठ्या पदांवर काम करून निवृत्त झाले आहेत. दहावी, बारावीसह स्पर्धा परीक्षेतही या समाजातील मुले चमकत आहेत. नुकत्याच लागलेल्या दहावी परीक्षेत कोगेच्या वैष्णवी नामदेव सुतार हिने ९३.६० टक्के गुण मिळवून उत्तुंग यश मिळविले आहे. उजळाईवाडी येथे नारायण निट्टूरकर, उद्योजक वसंतराव लोहार, पांडुरंग सोनाळकर, शंकरराव लोहार, राम सुतार यांनी अथक प्रयत्नाने दीड एकर जागेवर विश्वकर्मानगर ही घरकुल योजना उभारली आहे.
कुशल, तंत्रज्ञ, हरहुन्नरी सुतार समाज
By admin | Published: June 28, 2015 11:46 PM