कसबा बावडा : राजाराम बंधाऱ्यावरील स्लॅब पुराच्या पाण्यामुळे तिसऱ्यांदा वाहून गेला. गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने राजाराम बंधारा आज खुला झाला. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला.राजाराम बंधाऱ्यावर मे २०१८ दरम्यान सिमेंट कॉंक्रिटचा रस्ता करण्यात आला होता.मात्र त्यानंतरच्या पहिल्याच पावसात २६ जून ला बंधार्यावरील स्लॅब वाहून गेल्याचे निदर्शनास आले. गतवर्षीही स्लॅब वाहून गेला होता. यावर्षी पावसाला वेळेत सुरुवात झाली.
१६ जुन रोजी बंधारा पंचगंगेच्या पाण्याखाली गेला होता. तो २२ जुन रोजी खुला होताच स्लॅबचा काही भाग या वर्षीही वाहून गेल्याचे निदर्शनास आले. पाटबंधारे विभागाच्या वतीने बंधाऱ्यावर निखळलेले स्लॅबचे तुकडे जेसीबी च्या साह्याने काढून घेण्यात आले आणि दुचाकी वाहतूक सुरू करण्यात आली.दरम्यान बंधार्यावरून चार चाकी वाहतुकीला बंदी आहे. तसे फलकही बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूस लावण्यात आले आहेत. मात्र त्याकडे डोळेझाक करून चार चाकी वहातूक होत आहे. त्याचाही परिणाम स्लॅब निखळण्यास झाला आहे असल्याचे पाटबंधारेचे मत आहे.
पावसाळ्यानंतर स्लॅबच्या कामाचा निर्णय घेण्यात येईल असे या विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. नवीन टाकण्यात येत असलेला स्लॅब व बंधाऱ्याचा मूळ रस्ता यांची एक मेकाला म्हणावी तशी अडक होत नसल्याने असा प्रकार घडत असल्याचेही पाटबंधारे विभागाचे म्हटले आहे.