हुपरी : शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी राज्य शासनाकडून राबविण्यात येणारा मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी हा प्रकल्प रेंदाळ (ता. हातकणंगले) येथील २५ एकर गायरानात उभारण्यात येत आहे. हा प्रकल्प उभारण्याचा ठेका घेतलेल्या कंपनीने वनीकरणातील शेकडो झाडांची दिवसाढवळ्या कत्तल करून ग्रामस्थांचा रोष ओढवून घेतला आहे. या प्रकल्पासाठी ग्रामपंचायतीने पाच हेक्टर जागा देण्याचा ठराव दिला असताना प्रत्यक्षात मात्र १० हेक्टर जागा संपादित करण्यात आली आहे.दरम्यान, या प्रकल्पातून गावच्या यंत्रमाग व्यवसायास व पाणीपुरवठा योजनेला मोफत वीजपुरवठा करण्याबरोबरच अन्य मागण्या ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी केल्या आहेत. त्याकडे मक्तेदार कंपनी व महावितरणने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून अत्यंत घाईगडबडीने कामास सुरुवात करण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यामुळे शासनाच्या या चांगल्या उपक्रमाला ग्रामस्थांकडून दुर्दैवाने विरोध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.या प्रकल्पासाठी गायरानची जागा देण्याचा गावसभेत एकमुखी ठराव करण्यात आला. ग्रामस्थांनी गावच्या हिताच्या काही मागण्याही यावेळी केल्या होत्या. या मागण्या मान्य करवून घेऊनच हा प्रकल्प उभारण्यास सुरुवात करण्यात यावी, असे सुचविले होते. गावकऱ्यांच्या या मागण्यांचे पुढे काय झाले? हे सांगण्याअगोदरच केवळ दोनच दिवसांत मक्तेदार कंपनीकडून अत्यंत घाईगडबडीने जागा ताब्यात घेऊन वनीकरणातील वृक्षतोड केली आहे.
सौर प्रकल्प उभारण्यात येणार असल्याने एक वर्षापूर्वी पाच हेक्टर जमीन देण्याचा ठराव दिला होता. मात्र प्रत्यक्षात १० हेक्टर जागा संपादित केली आहे. गावच्या हिताच्या अन्य काही मागण्याही जिल्हाधिकारी कार्यालय व महावितरण कंपनीला कळविल्या आहेत. याबाबत त्यांच्याकडून अद्याप काहीही उत्तर मिळालेलं नाही; त्यामुळे गैरसमज निर्माण होत आहेत. - अभिषेक पाटील, उपसरपंच