सचिन भोसले / प्रवीण देसाई - कोल्हापूरलोकसंख्येच्या प्रमाणात स्वच्छतागृहे अपुरी असून, ती वाढवावीत, त्यांची वेळेवर स्वच्छता करावी, पिण्याच्या पाण्याचा स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा व्हावा, अस्वच्छतेमुळे डासांचे साम्राज्य वाढल्याने आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात, तसेच कत्तलखान्यातून बाहेर पडणाऱ्या रक्तमिश्रित पाण्यामुळे दुर्गंधी पसरते व आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे त्याचे तातडीने स्थलांतर करावे, परिसरात व्यायामशाळा, सांस्कृतिक हॉल, सार्वजनिक वाचनालय, भाजीपाला मार्केट व्हावे, अशा एक ना अनेक समस्यांचा पाढा सदर बाजार येथील नागरिकांनी शुक्रवारी ‘लोकमत आपल्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून वाचला.सदर बाजार परिसरातील प्रकाश विद्यामंदिर समोरील चौकात सायंकाळी साडेपाच वाजता झालेल्या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होत आबालवृद्धांनी परिसरातील विकासांबाबतच्या अपेक्षा व्यक्त केल्या.सदर बाजारासह विचारेमाळ, निंबाळकर माळ या परिसरात सुमारे ३० हजारांंंहून अधिक लोकसंख्या आहे. येथे कष्टकरी लोकांचे प्रमाण मोठे असून, सुशिक्षित व उच्च, मध्यमवर्गीय लोकांचेही वास्तव्य या ठिकाणी आहे. त्यामुळे विकासकामे करताना येथील लोकप्रतिनिधींची चांगलीच दमछाक होते. कचरा उठावासाठी परिसरात घंटागाडी सुरू करण्यात आली आहे. कचरा उठाव वेळेवर होत असला, तरी नागरिकांत याबाबत जागरूकता नसल्याने काही ठिकाणी कचरा अस्ताव्यस्त पडत असल्याचे दिसत आहे. या परिसरात चार शाळा व एक महाविद्यालय असून, ती मुख्य रस्त्यावरच आहेत. शाळा व महाविद्यालयांच्या दारात सूचनादर्शक फलक लावले नसल्याने या मार्गावरून भरधावपणे जाणाऱ्या वाहनांमुळे अपघातांचे प्रसंग घडले आहेत. त्यामुळे या ठिकाणी फलक लावण्याची गरज आहे. पाण्याचा पुरवठा नियमितपणे होतो. परंतु, तो अनियमित व अस्वच्छ होतो. त्यामुळे स्वच्छ व मुबलक पाणी येण्याची गरज आहे. परिसरात जनावरांचा कत्तलखाना असून, त्याच्या स्थलांतराचा प्रस्ताव आहे. तो लवकर व्हावा, अशी येथील नागरिकांची मागणी आहे. कारण तेथील अस्वच्छ व दुर्गंधियुक्त पाण्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. परिसरातील विविध कॉलन्या व सोसायटीमधील गटारी या सदर बाजाराला जोडल्यामुळे मुळातच सखल भागात असणाऱ्या या परिसरात गटारी तुंबून डासांचे साम्राज्य पसरते. यामुळे औषध फवारणी वरचेवर होणे गरजेचे आहे. परिसरात व्यायामशाळा, सांस्कृतिक हॉल, सार्वजनिक वाचनालये नाहीत. त्यामुळे महापालिकेने प्राधान्याने याचा विचार करून या गोष्टी लवकरात लवकर या ठिकाणी कराव्यात. परिसरात भाजी मार्केट नसल्याने नागरिकांना दूरवर जावे लागते. त्यामुळे या ठिकाणी मार्केट व्हावे, अशी मागणी नागरिकांची आहे. उघड्या गटारींमुळे लहान मुले शौचास बसण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे या गटारी बंदिस्त करून परिसराला दुर्गंधिमुक्त करावे, असा सूर आहे.नागरिक म्हणतात...नागरिकांनी स्वयंशिस्त पाळणे गरजेचेपरिसरातील स्वच्छतेवर अधिक भर दिला आहे. साफसफार्ईसाठी वारंवार सफाई कर्मचाऱ्यांचा राबता या परिसरात आहे. परिसरातील नागरिकांनी ओला कचरा थेट गटारात न टाकता घंटागाडीत टाकावा, असे वारंवार आवाहन व जागृती केली जात आहे. शौचालयांच्या स्वच्छतेबाबत नागरिकांनीही स्वयंशिस्त लावणे गरजेचे आहे. परिसराचा कायापालट करण्यासाठी विविध निधीतून कामे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. - महेश जाधव, नगरसेवक गटारी बंदिस्त असाव्यातसदर बाजार परिसरातील मुख्य चौकालगत प्रकाश विद्यामंदिर परिसरात अनेक गटारी उघड्या आहेत. या उघड्या गटारींवर लहान मुले शौचास बसतात. त्यामुळे दुर्गंधी व डासांचा प्रादुर्भाव अधिक होत आहे. याचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिकेने गटारी बंदिस्त करणे गरजेचे आहे. - भरत रसाळे, मुख्याध्यापकगटारींची स्वच्छतासदर बाजार कत्तलखाना परिसरातील गटारी वेळोवेळी साफ होत नाहीत. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने गटारी साफ करणे गरजेचे आहे.- मालन रास्ते अपुरा पाणीपुरवठा परिसरात लोकसंख्या अधिक असल्याने दिवसातून किमान दोनवेळा स्वच्छ पाणीपुरवठा महापालिकेने करावा. याचबरोबर दिवसातून दोनवेळा घंटागाडी परिसरातून फिरवावी.- अमोल भोसले स्वच्छ पाणीपुरवठा करावासदर बाजार येथे लोकसंख्या दाटीवाटीची आहे. त्यात महापालिकेच्या ड्रेनेज लाईनबरोबरच पाण्याच्या पाईपही बऱ्याच वर्षांच्या आहेत. त्यामुळे त्या बदलून नवीन पाईपलाईन टाकून परिसराला स्वच्छ पाणीपुरवठा करावा. - सुमन बुचडे डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फवारणीगटारी उघडी असल्याने रात्री सहानंतर डासांच्या झुंडीच्या झुंडी येतात. त्यामुळे विशेषत: लहान मुलांचे आणि वृद्धांचे आरोग्य वारंवार बिघडत आहे. त्यामुळे महापालिकेने डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आठवड्यातून किमान दोनवेळा तरी डास प्रतिबंधक औषधांची फवारणी करणे गरजेचे आहे.- मोहन बुचडेकर्मचारी सवडीने करताहेतगटारींची स्वच्छता सदर बाजार येथील कोरगावकर हायस्कूल परिसरातील छोट्या घरांसमोरील गटारी महापालिका कर्मचाऱ्यांना साफ करण्यास सांगितल्यास ते कर्मचारी कधी आठवड्याने, तर कधी वेळ मिळेल त्याप्रमाणे सफाई करतात. त्यामुळे या परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. - सचिन सूर्यवंशी मॉर्निंग वॉक ट्रॅकची गरजआंबेडकर भवन येथे प्रस्तावित असणारा मॉर्निंग वॉक ट्रॅक लवकरात लवकर व्हावा. नुसती खडीच आणून टाकली आहे. येत्या काही दिवसांत तो पूर्ण होणे आवश्यक आहे. - अभिजित कांबळे स्वच्छ पाणीपुरवठ्यासाठी नवीन जलवाहिनी टाकावीआरोग्याच्यादृष्टीने पाणी महत्त्वाचे आहे. त्यामुळे स्वच्छ पाणीपुरवठा परिसराला आवश्यक बाब आहे. याकरिता नवीन पाईपलाईन टाकल्यास परिसराचा स्वच्छ पाण्याचा प्रश्न मिटेल.- राजेंद्र पांढरबळेसार्वजनिक वाचनालय हवेया परिसरात हायस्कूल व विद्यालयांची संख्या मोठी आहे. येथे महापालिकेच्यावतीने सार्वजनिक वाचनालय झाल्यास येथील विद्यार्थ्यांना चांगली सुविधा मिळेल.- इंद्रजित राजपाल
कत्तलखान्यामुळे आरोग्य धोक्यात
By admin | Published: March 20, 2015 11:08 PM