कोल्हापूर : बहुजन समाजातील जाती-जमाती आणि अल्पसंख्याकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी हे आपल्या समाजाचे प्रश्न संसदेत मांडू शकत नाहीत. कारण ते देशातील ब्राह्मणांच्या पक्षांचे गुलाम आहेत़ काँग्रेस, भाजप तसेच डावे पक्ष हे ब्राह्मणांच्या वर्चस्वाखालील पक्ष आहेत़ त्यामुळे बहुुजन आणि अल्पसंख्याकांचे प्रश्न हे गुलाम प्रतिनिधी सोडवू शकत नाहीत, असे प्रतिपादन ‘बामसेफ’चे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केले़भारत मुक्ती मोर्चातर्फे सोमवारी दसरा चौक येथील मुस्लिम बोर्डिंगच्या प्रांगणात आयोजित केलेल्या ओबीसी-मुस्लिम परिषदेत अध्यक्षीय भाषणात म्हणून ते बोलत होते़ मराठा, मुस्लिम लिंगायत आणि धनगर आरक्षण व निवडणूक हा व्याख्यानाचा विषय होता़ मेश्राम म्हणाले, आरक्षणाबाबत चुकीचा प्रचार, आरक्षण विरोधकांनी सातत्याने केला आहे़ पण आरक्षण हे केवळ गरिबी निमुर्लनासाठी किंवा नोकरीसाठी नाही़ प्रतिनिधीत्वाचा हक्क न मिळालेल्यांना प्रतिनिधीत्व देणे हा आरक्षणाचा उद्देश आहे पण ही बाब आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांनाही माहीत नाही़ लोकशाहीच्या चारही घटकांमध्ये जनतेला प्रातिनिधिक स्वरूपात हिस्सेदारी मिळाली पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने लोकशाहीला अर्थ प्राप्त होईल, अन्यथा ती केवळ निवडणूकशाहीच राहील़मराठा समाजाला शासनकर्ती जमात आहे, तर या समाजाला आरक्षण का मागावे लागते, याचा संदर्भ देत मेश्राम म्हणाले, मराठा, ओबीसी आणि अनुसूचित जाती आणि जमाती आणि अल्पसंख्याकांचे लोकप्रतिनिधी समाजाच्या प्रश्नांसाठी भांडत नाहीत़ कारण या लोकप्रतिनिधींचे लगाम त्यांच्या पक्षश्रेष्ठींच्या हातात आहेत़ ब्राह्मणी शक्ती बहुजन समाज आणि अल्पसंख्याकांच्या आरक्षणप्रश्नी विविध प्रकारचे अडथळे निर्माण करतात़ मल्हार सेनेचे बबन रानगे म्हणाले, राष्ट्रवादी काँगे्रस आणि काँग्रेस पक्षाने धनगर समाजाला निवडणूक काळात आरक्षणाचे आमिष दाखविले, पण त्याची पूर्तता केली नाही़ त्यामुळे या पक्षांना समाजाने हिसका दाखविला, आता फडणवीस सरकारने धनगर समाजाच्या आरक्षणाचे आश्वासन दिले होते, हे आश्वासन न पाळल्यास पुढील निवडणुकीत त्याचे परिणाम भोगावे लागतील़ बहुजन मुक्ती पार्टीचे राज्याध्यक्ष बाळासाहेब पाटील म्हणाले, आरक्षण विरोधकांविरोधात आरक्षण समर्थनाची लढाई लढण्यासाठी बहुजन समाज आणि अल्पसंख्याकांनी मूलनिवासी आणि बहुजन मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखाली एकत्र यावे़ मौलाना हरिस साहब म्हणाले, ‘घर वापसी’ला न घाबरता मुस्लिम समाजाने समानता आणि न्याय्य हक्कांच्या लढाईसाठी भारत मुक्ती मोर्चाला साथ द्यावी़ सोपान पाटील यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन झाले़ यावेळी विलास साठे, दत्तात्रय डांगे, विश्व लिंगायत महासभेचे उपाध्यक्ष नामदेव कोरे, मराठा सेवा संघाचे डॉ़ राजीव चव्हाण, सौरभ देसाई, मुस्लिम बोर्डिंगचे प्रशासक कादर मलबारी यांनी मार्गदर्शन केले़ सुजित हेगडे यांनी प्रास्ताविक केले, संदीप कांबळे यांनी आभार मानले़ (प्रतिनिधी)
लोकप्रतिनिधी ब्राह्मण पक्षांचे गुलाम
By admin | Published: February 10, 2015 12:40 AM