लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी पावसाची उघडझाप राहिली. पावसाच्या सरी येऊन गेल्या की पुन्हा आकाश स्वच्छ व्हायचे, त्यामुळे श्रावण महिन्यासारखे दिवसभर वातावरण राहिले.
‘तौक्ते’ चक्रीवादळाने सुरू झालेला पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. बुधवारी सकाळपासूनच ग्रामीण भागात पावसाची भुरभुर सुरू होती. ढगाळ वातावरण आणि पाऊस राहिल्याने दिवसभर जोरात तडाखा देणार असेच वाटत होते. मात्र, सकाळी अकरानंतर आकाश स्वच्छ होत गेले. पुन्हा दुपारी अधूनमधून जोरदार सरी कोसळत राहिल्या. दुपारी तीननंतर कडकडीत ऊन पडले. सायंकाळी पुन्हा ढगाळ वातावरण राहिले. एकूणच श्रावण महिन्यात जसा ऊन-पावसाचा लपंडाव असतो, त्याप्रमाणे दिवसभर वातावरण राहिले. दिवसभरात कमाल २९ तर किमान २३ डिग्री तापमान राहिले. आज, गुरुवारपासून तापमानात थोडी वाढ होणार आहे. कमाल तापमान ३३ डिग्रीपर्यंत पोहोचेल, असा अंदाज वर्तविला आहे.
आज पाऊस नाही
गेली चार-पाच दिवस जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. आज, गुरुवारी काही काळ ढगाळ वातावरण राहील. त्यानंतर ऊन पडेल. मात्र, पाऊस पडण्याची शक्यता कमी असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.