शेखर धोंगडे।कोल्हापूर : खासगी आरामबसेसशी स्पर्धा करण्यासाठी एस.टी. महामंडळही आता आपल्या ताफ्यात स्लीपर कोच बसेस आणत आहे.महामंडळाने सध्या राज्यभरात १३०० नवीन बसेसची बांधणी सुरू केली आहे. यामध्ये ४०० बसेस या बैठक व्यवस्था असलेल्या वातानुकुलित शिवशाही असणार आहेत; तर २०० बसेसमध्ये स्लिपर कोच (शयनयान) आणल्या जात आहेत. या ६०० गाड्यांच्या बांधणीचे काम कोल्हापूर विभागाचे यंत्रअभियंता करत आहेत. यापैकी ४१ गाड्यांची नोंदणी कोल्हापुरात केली जाणार आहे.
राज्यात लांबच्या प्रवासासाठी बहुतांश प्रवासी हे खासगी आरामबस अथवा शयनयानी बस पसंत करतात. त्यांना आपल्याकडे वळविण्यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि एस.टी. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देवल यांच्या संकल्पनेतून आरामदायी बैठकव्यवस्था असलेल्या शिवशाही व झोपण्याचीही (स्लीपर कोच) व्यवस्था असलेल्या काही बसेस महामंडळाच्या ताफ्यात आणण्याचा निर्णय झाला आहे.
यात कोल्हापूर विभागाकडून ४०० पूर्ण वातानुकूलित (एसी) शिवशाही, आणि २०० शयनयानी म्हणजेच स्लीपर कोच व आरामदायी बैठक व्यवस्था असलेल्या अशा ६०० बसेस तयार होत आहेत. त्यांची बांधणी व तपासणी आगारातील यंत्रअभियंता अल्फ्रेड मार्टीन रॉड्रीक्स, विभाग नियंत्रक रोहन पलंगे, तसेच त्यांचे सहकारी करीत आहेत. तयार झालेल्या ४१ बसेस कोल्हापूर येथे शनिवारी आरटीओ विभागात नोंदणीसाठी आल्या आहेत. यासारख्या अन्य बसेसही टप्प्याटप्प्याने अन्य विभागात तयार केल्या जाणार असून, लवकरच या बसेस प्रायोगिक तत्त्वावर सुरुवातीला रात्रीच्या वेळेस विविध आगारातून धावणार आहेत.बसमधील अन्य सुविधा अशाबसच्या खालील बाजूस २८ आसनी बैठक व्यवस्था, वरील दोन्ही बाजंूने सिंगल व डबल अशी एकूण १५ स्लीपर कोचची व्यवस्था, जीपीएस चार्जरची व्यवस्था, दोन सुरक्षा दरवाजे, अग्निशमक यंत्र, तंदुरुस्त बॉडी, प्रशस्त खिडक्या, अश व्यवस्था करण्यात आली आहे. अत्यावश्यक गरज वाटल्यास थांबण्यासाठी स्टॉपचे बटनदेखील आहे.
परिवहन मंत्री तथा एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते आणि व्यस्थापकीय संचालक रणजित सिंह देवल यांच्या प्रयत्नांतून हा नवा प्रकल्प राबविण्यात येत असून, सर्वसामान्य प्रवाशांना आहे त्याच एस.टी.च्या दरात व झोपून जाता येईल यासाठी नव्या एस. टी. बसेस बनविल्या जात आहेत. - अल्फ्रेड मार्टीन रॉड्रीक्स, यंत्रअभियंता कोल्हापूर.