कोल्हापूर : घुबडांविषयी अंधश्रध्दा दूर करणे तसेच घुबडांच्या संरक्षण व संवर्धनासाठी जनजागृती करण्यासाठी कोल्हापूरातील चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीने पुढाकार घेतला आहे. इला फौंडेशनच्या सहकार्याने आॅक्टोबर महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये घुबडांविषयी माहिती देणारे स्लाईड शो आयोजित करण्यात आले आहेत.भारतात घुबडांच्या ४0 प्रजाती आहेत. त्यापैकी ९ जाती या केवळ भारतातच आहेत. शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या घुबडांना केवळ अंधश्रध्देमुळे मोठ्या प्रमाणात मारले जाते. ट्रॅफिक या संस्थेच्या २0१४ सालच्या अहवालात देशात वर्षाला ७८ हजार घुबडे मारली जात असल्याचा उल्लेख आहे.
या पार्श्वभूमीवर पुण्यात इला फौंडेशनमार्फत नोव्हेंबर २0१९ मध्ये देशातील पहिली आंतरराष्ट्रीय घुबड परिषद होणार आहे. या परिषदेत ४२ देश सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर जेजुरीजवळ २९ व ३0 नोव्हेंबर २0१८ रोजी भारतीय उलूक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळ आणि इला फौंडेशन यांच्या माध्यमातून घुबडांविषयी अंधश्रध्दा दूर करणे व संवर्धन-संरक्षणासाठी माहितीपट व स्लाईड शोच्या माध्यमातून आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात कोल्हापूर जिल्ह्यातील ५0 शाळांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.या उपक्रमाचा प्रारंभ ३0 सप्टेंबर रोजी शाहू स्मारक भवन येथे होणार आहे. तत्पूर्वी चिल्लर पार्टीतर्फे मुलांसाठी दर महिन्याला दाखविण्यात येणाऱ्या चित्रपट उपक्रमात सकाळी १0 वाजता द लिजंड आॅफ गार्डियन्स हा चित्रपट विनामूल्य दाखविण्यात येणार आहे.
याच कार्यक्रमात घुबडांविषयीचा माहितीपट दाखविण्यात येणार असून इला संस्थेचे प्रतिनिधी मुलांशी संवाद साधणार आहेत. हा उपक्रमांतर्गत ज्या शाळांना सहभागी व्हायचे आहे, त्यांनी या उपक्रमाच्या चिल्लर पार्टीच्या समन्वयक शिवप्रभा लाड आणि इला फौंडेशनचे कोल्हापूर प्रतिनिधी बंडा पेडणेकर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन चिल्लर पार्टीतर्फे करण्यात आले आहे.