कोल्हापूर : भिशीच्या व्यवहारातील ३ लाख ८१ हजार रुपये दहा टक्के व्याजासह वसुलीसाठी आर. सी. गँगच्या गुन्हेगारांनी शिवाजी चौक परिसरातील दूकानात घुसून चप्पल विक्रेत्यास बेदम मारहाण केली. यावेळी दूकानातील साहित्याची तोडफोड करुन मोठी दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. मारहाणीमध्ये विक्रेता पंढरीनाथ रामचंद्र कदम (वय ५१, रा. रिषभ साधना अपार्टमेंन्ट, नागाळा पार्क) हे जखमी झाले. शुक्रवारी रात्री हा प्रकार घडला.दरम्यान जुनाराजवाडा पोलीसांनी खासगी सावकार अनिल राजहंस पोळ (वय ५०, रा. ढोर गल्ली, रविवार पेठ) याला अटक केली. आरसी गँगचे सनी राम साळे, विशाल सुरेश पवार, अमित अंकुश बामणे, विक्रम जाधव (सर्व रा. सुभाषनगर) हे पसार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. या सर्वांवर बेकायदेशी भिशी, सावकारकी, मारहाण आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी सांगितले, पंढरीनाथ कदम यांचे शिवाजी चौकात नवभारत कोल्हापूरी चप्पल दूकान आहे. गेल्या पंचवीस वर्षापासून ते याठिकाणी व्यवसाय करीत आहेत. येथील व्यापारी वर्ग लिलाव पध्दतीने भिशी घेत असतात. संशयित अनिल पोळ याचाही भिशीमध्ये समावेश आहे.
कदम यांचेकडे ३ लाख ८१ हजार भिशीचे पैसे आले होते. त्यातुन गेल्या सहा महिन्यापासून कदम आणि पोळ यांच्यात वाद सुरु होता. सहा महिन्यापूर्वी याच व्यवहारातून पोळ याने कदम यांच्या वृध्द आईला मारहाण केली होती. शुक्रवारी रात्री साडेसातच्या सुमारास कदम व त्यांचे कामगार दूकानात असताना आरसी गँगचे गुन्हेगार सनी साळे, विशाल पवार, अमित बामणे, विक्रम जाधव जबरदस्तीने दूकानात घुसले.
कदम यांना अनिल पोळ यांचे भिशीचे वाटणीचे ३ लाख ८१ हजार रुपयांचे दहा टक्के व्याजाने प्रत्येक महिन्याला दहा हजार तुला द्यावे लागतील अशी खंडणीची मागणी करुन बेदम मारहाण केली. यावेळी दूकानातील साहित्याची तोडफोड करुन प्रचंड दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. अचाकन झालेल्या हल्ल्याने कदम बिथरुन गेले.
खंडणी द्यायची नाहीतर तुला जसे मारले आहे तसे घरच्यांना मारल्याशिवाय राहणार नाही अशी धमकी देवून निघून गेले. त्यानंतर कदम यांनी सीपीआरमध्ये उपचार घेवून पोलिसांत फिर्याद दिली. पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव तपास करीत आहेत.