माजी आमदार व नगराध्यक्षा यांच्याकडून पाहणी
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहर व परिसरात पावसाने गेल्या दोन दिवसांपासून उसंत घेतली आहे. नदीकाठच्या भागात सन २०१९ सालातील महापुरापेक्षा यावेळी वेगाने वाढ सुरू होती. मात्र, पावसाचा जोर कमी प्रमाणात असल्याने पाणी पातळीत संथगतीने वाढ होत आहे. तरीही पाणी वाढण्याच्या भीतीपोटी नागरिकांचे स्थलांतर सुरूच आहे. त्यामुळे नागरिक अद्याप भीतीच्या छायेखाली आहेत. रविवारी नदीची पाणी पातळी ७९ फुटांपर्यंत होती. आतापर्यंत सतरा हजार नागरिकांना १५ छावण्यांमध्ये, तर ५५० जनावरांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
इचलकरंजी शहराला लागून असलेल्या गावांना बेटाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. धरण पाणलोट क्षेत्रात देखील पावसाचा जोर कमी आहे. अनेक धरणे भरत आली आहेत. रविवारी दिवसभरात खासदार धैर्यशील माने, माजी आमदार सुरेश हाळवणकर, नगराध्यक्षा अलका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, स्वप्निल आवाडे, पोलीस उपअधीक्षक बाबूराव महामुनी यांनी पूरस्थितीची पाहणी केली. तसेच स्थलांतर केलेल्या नागरिकांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.
दरम्यान, चंदूर (ता. हातकणंगले) गावाला बेटाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. गावभागास पाण्याने वेढा दिला असून, ९०० कुटुंबांतील पाच हजार ग्रामस्थांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर केले आहे. गावभागातील कुंभार गल्ली, आंबेडकर पुतळा परिसर, धनगर गल्ली, मिठारी गल्ली, बसस्थानक परिसर, खटावकर गल्ली आदी ठिकाणी नागरी वस्तीत पाणी शिरले आहे.
गावातील लहान-मोठ्या एक हजार ३०० जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. स्थानिक रेस्क्यू फोर्सने त्यांना महापुरातून बाहेर काढले. रेस्क्यू टीममध्ये श्रीकृष्ण मांगलेकर, गजानन मांगलेकर, सुधीर पाटील आदींचा समावेश आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्यावतीने दोन ठिकाणी छावण्या तयार करून तेथे राहण्याची सोय केली आहे. परिस्थितीवर पं. स. सदस्य महेश पाटील, सरपंच अनिता माने, पोलीसपाटील राहुल वाघमोडे, तलाठी सीमा धुत्रे आदी लक्ष ठेवून आहेत. गावामध्ये पोलीस प्रशासनाचे पथक तैनात आहे.
चौकट
पूरग्रस्तांना मदत मिळण्यासाठी प्रयत्नशील : हाळवणकर
कोरोना काळातच महापुराचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे पालिकेने पूरग्रस्तांना योग्य सोयी-सुविधा पुरवाव्यात. जेवणाची व आरोग्य सुविधांची काळजी घ्यावी. प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला मदत मिळावी, यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत मुख्यमंत्री व राज्य शासनाकडे मागणी करणार असल्याचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी पूरग्रस्त भागाच्या भेटीदरम्यान सांगितले.
फोटो ओळी
२५०७२०२१-आयसीएच-०१
चंदूर (ता. हातकणंगले) येथील पूरपरिस्थितीचे छायाचित्र ड्रोन कॅमेऱ्याद्वारे शरद पाटील यांनी टिपले आहे.