कोल्हापूर : सागरमाळ स्पोर्टस असोसिएशनच्या वतीने शहरातील झोपडपट्टीमधील मुलांना दत्तक घेऊन त्यांना लेदरबॉल क्रिकेटचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. फक्त प्रशिक्षण देऊन न थांबता सागरमाळ स्पोर्टस असोसिएशनचा संघ तयार करण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरुवात रविवारी (दि. ११) सकाळी शास्त्रीनगर मैदान येथे झाली. शहरातील ४५ घोषित झोपडपट्ट्यांमधील १२ ते १६ वर्षे वयोगटातील १२५ मुले आज निवड चाचणी शिबिरासाठी उपस्थित होती. या शिबिरातून ३५ मुलांची निवड करून त्यांना सागरमाळ स्पोर्टस असोसिएशनतर्फे दत्तक घेण्यात येणार आहे. आज सकाळी सर्व खेळाडूंची नोंदणी करण्यात आली. त्यानंतर प्रशिक्षक अविनाश रायकर, सूरज जाधव, किरण खतकर यांनी खेळाडूंची शारीरिक चाचणी घेऊन त्यांच्याकडून सराव करून घेतला. त्यानंतर या खेळाडूंची खेळानुसार विभागणी करण्यात आली. त्यांच्या आवडीनुसार त्यांना गोलंदाजी व फलंदाजी असे दोन गट तयार करून सराव करून घेण्यात आला. यावेळी माजी रणजीपटू रमेश कदम यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. हे शिबिर शास्त्रीनगर मैदानावर सलग १५ दिवस सुरू राहणार आहे. दररोज सकाळी सात वाजता यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. या शिबिरास कोल्हापूर जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष बाळ पाटणकर, विजय भोसले, केदार गयावळ, नंदू बामणे, नगरसेवक राजू साबळे, उदय साळोखे तसेच सागरमाळ स्पोर्टस असोसिएशनचे अध्यक्ष काकासाहेब पाटील, किरण खतकर, अविनाश रायकर, राजेश केळवकर, शैलेश भोसले, सचिन उपाध्ये, जमीर अथणीकर, राजू पठाण, अमोल पाटील, सूरज जाधव, नितीन माटुंगे, नीलेश पोवार, निरंजन घाटगे, विशाल कल्याणकर, ताज नंद्रेकर, अनिल सांगावकर, राजू चौगले, पांडू वार्इंगडे, तानाजी कागलकर, साहिल पाटील, दादू कांबळे, सुनील पाटील, आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
झोपडपट्टीतील मुले होणार क्रिकेटपटू अनोखा उपक्रम : सागरमाळ स्पोर्टस असोसिएशनतर्फे घेतले दत्तक
By admin | Published: May 12, 2014 12:29 AM