भारत चव्हाण / कोल्हापूर : मुंबई, पुणे शहरांत झोपडपट्टीतून कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत असल्याने खबरदारी म्हणून कोल्हापूर शहरातील झोपडपट्ट्यांकरिता महानगरपालिकेमार्फत एक ‘अॅक्शन प्लॅन’ तयार केला जात आहे. दुर्दैवाने जर झोपडपट्टीत कोरोनाचा शिरकाव झालाच, तर तातडीने कोणत्या उपाययोजना राबवाव्यात, याचा त्यात समावेश आहे.
कोल्हापूर शहर परिसरात एकूण ६४ झोपडपट्ट्या असून त्यामध्ये साधारण ६५ ते ७० हजार लोक राहात आहेत. त्यांच्या आरोग्याची काळजी महापालिका प्रशासन घेत आहे. गेले दोन दिवस महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी सर्व अधिकाऱ्यांना सोबत घेऊन हा अॅक्शन प्लॅन तयार करीत आहेत. त्याची पूर्वतयारी म्हणून अधिकारी स्तरावर कार्यवाही सुरू झाली आहे.
सर्व झोपडपट्ट्यांचा डाटा तयार केला जात आहे. झोपडपट्टीनिहाय आजी तसेच माजी नगरसेवकांचे नाव, फोन नंबर्स, महत्त्वाच्या व्यक्तींची यादी, परिसरातील डॉक्टर्सची नावे, फोन नंबर्स, नागरिकांची घरनिहाय माहिती, पाणी पुरवठ्याची सध्याची स्थिती, मेडिकल दुकाने, किराणा मालाची दुकाने, जवळपास असणारी मंगल कार्यालये, समाज मंदिर याची माहिती संकलित केली जात आहे.
समजा दुर्दैवाने एखाद्या झोपडपट्टीत जर कोरोना रुग्ण आढळलाच तर त्या परिसरातील नागरिकांना तेथून सुरक्षित ठिकाणी क्वारंटाईन करून संसर्ग वाढू न देणे, त्यासाठी तातडीच्या उपाययोजना कशा राबवता येतील याचे नियोजन केले जात आहे. या अॅक्शन प्लॅनला अंतिम स्वरूप देण्यात येत आहे.
सध्या महापालिका प्रशासनाने या झोपडपट्ट्यांवर लक्ष केंद्रित केले असून, त्या परिसरात औषध फवारणी, धूर फवारणी करण्यासह नागरिकांना मास्क वाटप केले जात आहेत. वैद्यकीय पथके थेट झोपडपट्टीत पाठवून नागरिकांच्या तपासण्या केल्या जात आहेत. किरकोळ आजारावर मोफत औषधोपचार केले जात आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक झोपडपट्टीकरिता त्या त्या विभागीय कार्यालयाकडील कर्मचारी नेमले असून त्यावर नोडल अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत.