कोल्हापूर : महापूर, वादळ आणि कोरोना संकटावेळी आरोग्य सुविधा आणि साधनांचा पुरवठा, कामगारांना पाठबळ, आदी स्वरूपात मदतीचा हात देणाऱ्यांचा शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (स्मॅक)कडून स्मॅक सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात आला. यामध्ये उद्योजक, महावितरणचे कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता.स्मॅकच्या ४५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त केशवराव भोसले नाट्यगृहात प्रेरणादायी वक्ते आणि शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक इंद्रजित देशमुख यांच्या हस्ते मानपत्र, शाल, कापडी पुष्पगुच्छ देऊन संकट काळात मदत करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, उद्योजक रामप्रताप झंवर, चंद्रशेखर डोली, दीपक आणि भरत जाधव, सचिन आणि सोहन शिरगावकर, महेंद्र आणि प्रकाश राठोड, पद्माकर आणि शिरीष सप्रे, सुनील जनवाडकर, सुरेंद्र जैन, तुकाराम पाटील, दीपक परांडेकर, प्रमोद पाटील, शेखर कुसाळे, राजेंद्र चौगुले, शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक किरण भोसले, प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी प्रवीण गिल्डा, महावितरणचे सहायक अभियंता संदीप गावडे यांचा सत्कार करण्यात आला.
यानंतर इंद्रजित देशमुख यांनी उद्योजकता व कुटुंब व्यवस्था या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला राजू पाटील, जयदीप चौगले, एम. वाय. पाटील, सचिन पाटील, नीरज झंवर, अमर जाधव, श्यामसुंदर तोतला, जयदत्त जोशीलकर, आदी उपस्थित होते. स्मॅकचे अध्यक्ष अतुल पाटील यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष दीपक पाटील यांनी आभार मानले.सृजनशीलता, संवादाचा संस्कार आवश्यकजुन्या पिढीने अनुभवातून उद्योग उभारला. त्यामध्ये सध्या दुसरी पिढी योगदान देत आहे. शिक्षणानंतर तिसरी पिढी थेट उद्योगात येत आहे. त्यामुळे राहात असलेला ह्यनॉलेज गॅपह्ण दूर करण्यासह आपल्या पाल्याला चांगला उद्योजक घडवायचे असेल, तर त्याच्यावर सृजनशीलता, संवाद कौशल्य, इतरांना मदतीचा हात देण्याचे संस्कार रूजविणे आवश्यक असल्याचे इंद्रजित देशमुख यांनी सांगितले.
आपल्याकडील माहितीचे ज्ञानात आणि ज्ञानाचे रूपांतर दृष्टीमध्ये व्हावे. ९५ टक्के प्रेम आणि ५ टक्के क्रोध या तत्वाने पाल्यांना घडवावे. पाल्यांमधील गुण, क्षमता ओळखून त्यांना ते देण्याची जबाबदारी पालकांनी पार पाडावी, असे सांगितले.