संदीप आडनाईककोल्हापूर : लेझर शोच्या तीव्र प्रकाशझोतामुळे रेटिनाच्या आजूबाजूला असणाऱ्या छोट्या रक्तवाहिन्या फुटतात असे नेत्ररोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे. राज्यातील मुंबई, नाशिक, पुणे, सांगली आणि कोल्हापूर शहरात गतवर्षी गणेशोत्सवाच्या काळात गणेश विसर्जनाच्या दिवशी काही गणेशोत्सव मंडळांनी लावलेल्या मोठ्या आवाजातील साउंड सिस्टीमसोबतच लेझर शोचेही गंभीर परिणाम समोर आले आहेत.
डोळा हा शरीरातील सर्वांत नाजूक अवयव आहे. त्यामुळे तो इतका संवेदनशील असतो की त्यात अत्यंत बारीक धूळ जरी गेली तरी त्याचा त्रास होतो. तरुणाईमध्ये लेझर शो उत्सवाच्या दिवशी लावणे हा ट्रेंड वाढतोच आहे. अनेक मंडळांमध्ये लेझर शो कोणाचा चांगला यावरूनही स्पर्धा असते. त्यामुळे अनेक मोठमोठे लेझर शो करणारे या कार्यक्रमासाठी विविध जिल्ह्यांतून येतात. मुंबई, पुणे, नाशिकमध्ये असणाऱ्या या लेझर शोचे लोण आता राज्यातील बहुतेक जिल्ह्यापर्यंत पोहोचलेले आहे.
अनेक वेळा उत्सवात नृत्य करताना कार्यकर्ते बेभान होऊन नाचतात. मात्र, या आनंदाच्या प्रसंगी लावलेल्या लेझर लाइटमुळे थेट डोळेच जाऊ शकतात याची अनेकांना जाणीव नाही. लेसर शोच्या लाइटमुळे अनेकांच्या डोळ्यांना गंभीर इजा झालेली आहे. त्यामुळे उघड्या डोळ्यांनी हे लेझर शो पाहू नयेत, पहायचेच असतील तर यासाठी तयार केलेल्या खास स्वरूपाचे चष्मे वापरले पाहिजेत, असे मत डॉ. मंदार जोगळेकर यांनी व्यक्त केले आहे.
असा होऊ शकतो त्रास?या लाइटमुळे डोळ्यांच्या बाहेरच्या बाजूला त्रास होतो, यामुळे डोळ्यातून पाणी येणे, चुरचुरणे आणि डोळा लाल होतो. अशावेळी डोळा जोरजोराने चोळला जातो, त्यामुळे डोळ्यातील लेन्सवर याचा परिणाम होतो.
तीव्र स्वरूपाचे लेझर लाइट हे टार्गेटेड असतात. डोळ्यांमधील रेटिनाच्या मध्यावर हा लाइट पडला तर डोळा भाजतो. तेथे काळे डाग पडतात. नजर अंधुक होते किंवा दृष्टी जाते. तीव्र प्रकाशझोतामुळे रेटिनाच्या आजूबाजूला असणाऱ्या छोट्या रक्तवाहिन्या फुटतात. त्याला वैद्यकीय भाषेत हेमोरेज (रक्तस्राव होतो) म्हणतात. त्यामुळेसुद्धा अंधत्व येते. - डॉ. मंदार जोगळेकर, नेत्ररोग तज्ज्ञ, सचिव, ऑप्थॉल्मॉजिकल सोसायटी ऑफ कोल्हापूर