लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : सध्या कोरोनाचे संकट दुसऱ्या टप्प्यामध्ये दिवसेंदिवस गडद होताना दिसत आहे. कोरोना रुग्णांना जास्त प्रमाणात व्हेंटिलेटर्सची गरज असते. याचा विचार करून येथील डीकेटीई इलेक्ट्रॉनिक्सच्या अंतिम वर्षातील विद्यार्थिनींनी स्मार्ट पोर्टेबल कृत्रिम अम्बुबॅग प्रकल्प बनविला आहे.
निशा संपकाळ, प्रतीक्षा पाटील, ऋतुजा मोळके व बसवेश्वरी कोरे यांनी मानवी यंत्रणेचा कमीत कमी वापर करून जास्तीत जास्त लोकांना श्वसनाच्या आजारातून मुक्त व्हावे या हेतूने हा प्रकल्प बनविला आहे. या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे पूर्वीच्या अम्बुबॅगला दरवेळी मानवरीत्या दाब द्यावा लागत होता. मानवरीत्या दाब देत असताना ऑक्सिजनचे प्रमाण हे एकसारखे न जाता कमी-जास्त प्रमाणात रुग्णांना होते; पण स्मार्ट पोर्टेबल कृत्रिम अम्बुबॅगमुळे ऑक्सिजनचे प्रमाण हे स्वयंचलित जात असल्याने आवश्यक त्या प्रमाणात रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो.
तसेच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या सहवासात सातत्याने राहणेदेखील धोक्याचे असू शकते, ही अडचण लक्षात घेता स्मार्ट कृत्रिम अम्बुबॅग विकसित केले आहे. यामुळे मानवी दाब न देता यंत्राच्या साहाय्याने हा दाब अम्बुबॅगवर देता येतो. कोरोना परिस्थितीमध्ये मानवी शरीराचे टेम्परेचर आणि रक्तदाब तपासणे शक्य नसते. ही बाब लक्षात घेता या प्रकल्पामध्ये स्वयंचलित टेम्परेचर आणि रक्तदाब तपासण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
अशा प्रकारे डॉक्टर, नर्सेस व आरोग्यसेवक यांच्या हिताचा विचार करून या विद्यार्थिनींनी हा प्रकल्प बनविला आहे. प्रकल्पासाठी प्रा.डॉ.पी.व्ही.कडोले, एल.एस. आडमुठे व प्रा. संतोष सलगर यांचे मार्गदर्शन लाभले. हा प्रकल्प तयार केल्याबद्दल विद्यार्थिनींचे संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, आर.व्ही.केतकर, मानद सचिव सपना आवाडे यांनी कौतुक केले.
फोटो ओळी
१४०४२०२१-आयसीएच-०१ डीकेटीईमधील इलेक्ट्रॉनिक्स विभागातील विद्यार्थिनींनी स्मार्ट पोर्टेबल कृत्रिम अम्बुबॅग प्रकल्प बनविला आहे.