शिवाजी सावंतगारगोटी : आदमापुर येथील संत बाळूमामा मंदिराच्या दारात फुलांचे हार विकता विकता शिक्षण घेणाऱ्या स्मिता दिगंबर बुडके (रा. चंद्रे, ता.राधानगरी) या विद्यार्थिनीने बारावीच्या परीक्षेत वाणिज्य शाखेत ८७.६७ टक्के गुण मिळवून आई वडिलांच्या जीवनात स्वकष्टाने सुगंध पसरवला आहे.स्मिता बुडके हिच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची. तुटपुंजी जमीन असल्याने वडिल दिगंबर बाळूमामा मंदिराच्या आवारात फुलाचे हार विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत. आई सुमित्रा ह्या गृहिणी आहेत. स्मिताचे प्राथमिक शिक्षण गावातील शाळेत झाले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण मुदाळ येथील प.बा.पाटील संकुलात झाले. वाणिज्य शाखेतील उच्च माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी तिने मुरगूड विद्यालय मुरगूड येथे प्रवेश घेतला. त्या शाळेतील तीनही शाखेमध्ये तिने अव्वल गुण मिळविले आहेत.वडिलांना व्यवसायात मदत करण्यासाठी ती दुपारी कॉलेज सुटल्यावर बारा वाजता आदमापुर येथील बाळूमामा मंदिराच्या समोर यायची. तेथे जेवणाचा डबा खायची. त्यानंतर वडिलांना हार तयार करण्यासाठी मदत करायची. जर हार तयार असतील तर ती विकण्यासाठी स्वतः मंदिराच्या समोर उभी राहायची. हा तिचा नित्याचा दिनक्रम आहे. आपल्या उज्ज्वल यशाने स्मिताने आई-वडिलांच्या कष्टाचे चीज केले. स्मिताला तिचे मामा आदमापूर येथील लोकमतचे अंक विक्रेते तानाजी पाटील याचे कायम मार्गदर्शन असते.
HSC Result 2022: दररोज हार विकले पण स्मिताने 'हार' नाही मानली, वाणिज्य शाखेत मिळवले ८७.६७ टक्के
By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2022 3:47 PM