कोल्हापूर : रेसकोर्स रोडवर जुने एनसीसी ऑफिसनजीक मैदानावर शालेय विद्यार्थ्यांच्या दोन गटांत धुमश्चक्री उडाली. दोन्ही गटांच्या विद्यार्थ्यांनी हॉकी स्टिक, दगडांचा वापर केला. या हल्ल्यात दोन विद्यार्थी जखमी झाले. हा प्रकार शनिवारी दुपारी घडला. सुमारे अर्धा तासाहून अधिक काळ हा प्रकार सुरू होता. पोलीस घटनास्थळी आल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान, जखमींच्या पालकांनी आमची कोणतीही तक्रार नसल्याचे पोलिसांना लेखी दिल्याने या प्रकारावर पडदा पडला.
पोलिसांनी दिलेली व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, हॉकी खेळाच्या वादातून शनिवारी दुपारी एका शाळेच्या दोन गटांतील विद्यार्थ्यांत वादावादी झाली. हा वाद वाढत गेल्याने विद्यार्थी एकमेकांच्या अंगावर धावून गेले. काही विद्यार्थ्यांनी हॉकी स्टिकनेही हल्ला केला. या घटनेमुळे परिसरात गोंधळ माजला होता. या हल्ल्यात दोन विद्यार्थी जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, जुना राजवाडा पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बळाचा वापर करत जमाव पांगविला. याप्रकरणी पोलिसांनी चौघा अल्पवयीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले; पण जखमी विद्यार्थ्यांच्या पालकांनी आमची कोणतीही तक्रार नसल्याचे पोलीस ठाण्यात लिहून दिल्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी सांगितले.