कोल्हापूर : स्वत:चे अस्तित्व लपविण्यासाठी सरनोबतवाडी (ता. करवीर) येथील सेंट्रिंग कामगार दत्तात्रय पांडुरंग नायकुडे (वय ४५) यांना दारू पाजून खून केल्याची कबुली कुख्यात गुंड लहू ढेकणे याने पोलिसांना दिली आहे. सोमवारी रात्री उशिरा त्याची आई, पत्नी व मुलांना या घटनेची माहिती देण्यात आली. यावेळी त्यांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. नायकुडे यांचा हकनाक बळी गेल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. लहू ढेकणे याचा खुनाचा बनाव स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी उघडकीस आणला. त्याला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसी खाक्या दाखविताच त्याने खुनाची कबुली दिली. उचगाव परिसरातील एका मद्यपी सेंट्रिंग कामगाराचा खून केल्याचे त्याने सांगितले होते. त्यानुसार ती व्यक्ती कोण, त्याचे नातेवाईक कोण, यासंदर्भात करवीरचे पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे यांनी कसून शोध घेतला असता सरनोबतवाडी येथील दत्तात्रय नायकुडे यांचे नाव निष्पन्न झाले. त्यानुसार त्यांचा भाऊ प्रकाश याला करवीर पोलीस ठाण्यात बोलविले. त्याने भाऊ दत्तात्रय १५ मे पासून बेपत्ता असल्याचे सांगितले. तसेच त्याच्या उजव्या पायाच्या अंगठ्याला काळी जखम आहे. पायात काळा दोरा असून, त्याला गाठी मारल्याचे सांगितले. त्यानुसार मृतदेहाचे व्हिडीओ चित्रीकरण दाखविले असता त्यांनी भावाचा मृतदेह असल्याचे सांगितले. दरम्यान, मृत दत्तात्रयच्या नातेवाइकाचे सोमवारी लग्न होते. त्यामुळे त्याचे नाव जाहीर करू नये, अशी विनंती भाऊ प्रकाश याने पोलिसांना केली होती. त्यामुळे कार्यक्रम पार पडल्यानंतर नाव जाहीर केल्याचे पोलीस निरीक्षक ढोमे यांनी यावेळी सांगितले. नायकुडे याच्या नातेवाइकांना या घटनेचा धक्काच बसला आहे. या संपूर्ण तपासाचे व्हिडीओ चित्रीकरण केले जात आहे. (प्रतिनिधी)गुंड ढेकणे याने मृत दत्तात्रयच्या अंगावरील रक्ताने माखलेले कपडे काढून त्यामध्ये त्याचे शिर, हाताचे पंजे व कोयता गुंडाळून पोत्यामध्ये बांधून ते कागलजवळील दूधगंगा नदीपात्रात फेकून दिले. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी ढेकणे याला नदी पुलावर नेऊन जागा दाखविण्यास सांगितली. त्यानंतर दिवसभर पानबुड्यांच्या साहाय्याने पोत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता ते मिळून आले नाही.
‘तो’ मृतदेह दत्तात्रय नायकुडे यांचा
By admin | Published: May 26, 2015 12:45 AM