समीर देशपांडेकोल्हापूर : राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील २० रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी आतापर्यंत २५ हजार ४३४ झाडांची तोड केली आहे, परंतु या बदल्यात कंत्राटदारांनी चौपट झाडे लावायची हाेती. ती लावली का? आणि लावली तर जगली का?, याची खातरजमा कोण करणार? असे प्रश्न उपस्थित होत आहे. जोपर्यंत कंत्राटदारांची कामे सुरू आहेत, तोपर्यंतच त्यांच्याकडून ही झाडे लावून जगवून घेण्याची गरज आहे.गेल्या तीन वर्षांत कोल्हापूर जिल्ह्यात चौफेर असलेल्या रस्त्यांची कामे सुरू आहेत. कागल सातारा, केर्ले रत्नागिरी ते राष्ट्रीय महामार्ग, फुलेवाडी ते गगनबावडा, रत्नागिरी कोल्हापूर, हातकणंगले ते चोकाक, संकेश्वर आंबोली, नांदगाव नांदारी, मुदाळ तिट्टा ते यमगे, सूळये ते हेरे, बाजार भोगाव ते अनुस्कुरा, केर्ली कोतोली नांदगाव, परखंदळे कळे गगनबावडा, सांगशी खोकुर्ले, पडळवाडी ते शिये अशा २० रस्त्यांची कामे सध्या सुरू आहेत. यातील काही कामे अंतिम टप्प्यात आहेत.या रस्त्यांच्या रुंदीकरणावेळी दुतर्फा असलेली अनेक झाडे तोडावी लागली आहेत. आजऱ्यासारख्या ठिकाणी तर दोन्ही बाजूच्या वडाच्या झाडांच्या कमानी होत्या. गर्द सावली देत असलेली ही अतिशय जुनी झाडेही तोडली आहेत. जिल्ह्यात या कामांसाठी मनाई असलेली ३ हजार ३०७ आणि मनाई नसलेली २२ हजार १२७ अशी एकूण २५ हजार ४३४ झाडे तोडण्यात आली आहेत. मात्र, त्या बदल्यात झाडे कुठल्या कंत्राटदाराने किती लावली आणि जगवली याची माहिती कुणाकडेच नाही.चौपट झाडे लावण्याची अटरस्त्याच्या कामासाठी जितकी झाडे तोडली जातील त्याच्या चौपट झाडे लावण्याची अट निविदामध्ये घातलेली असते. त्याच भागात किंबहुना पुन्हा रस्त्याच्या दुतर्फा ही झाडे लावावीत अशी अट असते. परंतु, कंत्राटदार याकडे फारसे गांभीर्याने लक्ष देत नाहीत. छोटी झाडे आणून लावायचे आणि फाेटो काढून ठेवायचे, असे प्रकार होत असल्याचे समजते. एकतर १०० टक्के झाडे जगत नसतात. त्यामुळे मेलेल्या झाडांच्या जागी पुन्हा नवी झाडे लावून ती जगवण्याचीच अट असताना जिल्ह्यात तसे होताना दिसत नाही.
उपवनसंरक्षकांचे पत्रयाच परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कोल्हापूरचे उपवनसंरक्षक जी. गुरूप्रसाद यांनी राष्ट्रीय महामार्ग विभाग, विशेष प्रकल्प, सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभाग, व्यवस्थापक व प्रकल्प संचालक परियोजना कार्यान्वय इकाई या चार विभागांच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र लिहून या रस्त्यांच्या दुतर्फा गेल्या दोन वर्षांत किती झाडे लावली, याची माहिती मागवली असून, या पावसाळ्यात किती लावणार आहेत, याचीही माहिती मागवली आहे.
तोडलेली झाडे
- मनाई असलेली ३,३०७
- बिगर मनाई २२,१२७
- एकूण २५,४३४
- (मनाई असलेल्या झाडांमध्ये आंबा, फणस, वड, पिंपळ, चिंच, साग, ऐन, किंजळ यांसारख्या झाडांचा समावेश होतो.)