कोल्हापूर : माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दोनवेळा अभय दिले, गुन्हेगारांना सोडणार असाल तर त्याची किंमत चुकवावी लागेल. दीड वर्षांत कोणावर कारवाई केली, स्थगिती कोणाला दिली, या सगळ्या भानगडी बाहेर काढू, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापूरचे पालकमंत्री व सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना दिला. गडहिंग्लज साखर कारखान्यामध्ये ज्यांची भ्रष्टाचाराबद्दल चौकशी सुरू आहे, अशांना निवडणुकीत सोबत घेतलेले चंद्रकांतदादा सहकार शुद्धिकरण कसा करणार, अशी विचारणा सदाभाऊ खोत यांनी केली. ‘स्वाभिमानी’चा मेळावा रविवारी कोल्हापुरातील शाहू मार्केट यार्ड येथे झाला. त्यावेळी राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांनी सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर चौफेर हल्ला चढविला. खासदार शेट्टी म्हणाले, सहकारमंत्र्यांच्या हातात सत्तेचा हंटर शोभेसाठी दिलेला नाही, त्यांनी चुकीचा कारभार करणाऱ्यांच्या पाठीवर फटके मारून सरळ करावेत. साखर कारखानदारांचे कान पकडून ‘एफआरपी’ची विचारणा करा, पण दादांच्या मनात काळेबेरे आहे, त्यांनी कारखानदारांना अंदाज दिलेला आहे, हे लपून राहत नाही. दीड वर्षांत कोणाच्या चौकशा केल्या, थांबविल्या कोणाच्या? या भानगडी माहिती अधिकारात काढाव्या लागतील. सहकार शुद्धिकरणाची कल्पना स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी मांडली होती, ती दिसत नसून ज्यांनी सहकार पोखरला त्यांनाच सन्मान मिळत असेल तर आम्हाला रस्त्यावर उतरावेच लागेल, असा इशारा देत सदाभाऊ खोत म्हणाले, गडहिंग्लज साखर कारखाना ज्यांनी संपविला त्यांनाच सोबत घेऊन दादांनी निवडणूक लढविली, ‘एफआरपी’बाबत झालेला ८०:२० करार हा लग्नातील होता, दादा यावर आम्ही ‘पीएच.डी’ केली आहे, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर कडी लावून कोण बसते, हे सगळ्या राज्याला माहिती आहे. मुश्रीफसाहेब हिंमत असेल तर दादांच्या दारात जाऊन बसा, तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही बसू; पण तुमच्या फायली सरकारकडे तयार असून आमच्या फायली तयार करू शकत नाहीत. जो कोणी तसा प्रयत्न करेल त्याचे थडगे बांधू, असा इशाराही खोत यांनी दिला. (प्रतिनिधी) चष्म्याचा नंबर वाढलाय साखर कारखानदार दिवसाढवळ्या उसाचा काटा मारत आहेत, ऊस तोडणी-वाहतूक दरात कारखान्यांची मनमानी सुरू असताना ते सहकारमंत्र्यांना दिसत नाही. त्यांच्या चष्म्याचा नंबर वाढल्याची उपरोधात्मक टीका खासदार शेट्टी यांनी केली. जि.प. स्वबळावर शेतकरी संघटनेची ताकद घराघरांत आहे, आमची कळ काढायची असेल तर जिल्हा परिषद निवडणुकीत काढा, असा इशारा देत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले.
...तर तुमच्या भानगडी बाहेर काढू : राजू शेट्टी
By admin | Published: April 04, 2016 1:05 AM