लोकमत न्यूज नेटवर्कजयसिंगपूर : न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळ्या घालाल तर देशभर त्याचा उद्रेक होईल, शेतकऱ्यांचे रक्त सांडला, तर हे आम्ही कदापि सहन करणार नाही. हे असेच चालू राहिले तर देशाच्या लाल किल्ल्यावरून मोदींना भाषण देखील करून देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला. मध्य प्रदेश येथे झालेल्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेट देण्यासाठी ते गेले होते. त्यावेळी ते उदयपूर, मध्य प्रदेश येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. यावेळी राजस्थानचे शेतकरी नेते रामपाल जाठ यांची प्रमुख उपस्थिती होती. खा. शेट्टी पुढे म्हणाले, देशात शेतकऱ्यांच्यावर गोळ्या चालविल्या जात आहेत. त्यांचे रक्त सांडले जात आहे. १५ वर्षे आघाडी सरकारने हेच केले आहे. मोदी सरकारही त्याच दिशेने वाटचाल करत आहे.देशातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात शेतकरी नेत्यांची १६ जून रोजी दिल्ली येथे बैठक होणार आहे. त्यानंतर हे आंदोलन देशभर नेले जाणार आहे. महाराष्ट्रात या आंदोलनाची सुरुवात झाली आहे. त्यानंतर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात व कर्नाटक या राज्यात धग गेलेली आहे. मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांच्या बाजूने देशातील शेतकरी ठामपणे उभा राहणार आहे. त्यांच्या मागण्या योग्यच आहेत. न्याय मागण्या मागत असताना गोळीबार कशाला केला? जगाच्या पोशिंंद्यावर गोळीबार करून शेतकऱ्यांना संपवण्याचा डाव यांनी आखलेला आहे. देशभरातील शेतकरी नेत्यांची बैठक दिल्लीतील गांधी फौंडेशन येथे बोलविण्यात आले आहे. शेतकऱ्यांचे रक्त सांडाल तर हेच शेतकरी यांची सत्ता उलथवून टाकतील, असा इशाराही खा. शेट्टी यांनी यावेळी दिला.
..तर मोदींचे भाषण थांबवू
By admin | Published: June 10, 2017 12:52 AM