कोल्हापूर : विधानसभेच्या निवडणुकीत माझ्या मतदारसंघात राजू शेट्टी यांनी केवळ सहा तासच प्रचार केला. मला निवडून आणले म्हणून सांगणाऱ्यांना स्वत:च्या जिल्ह्यात ‘स्वाभिमानी’च्या उमेदवारांची डिपॉझिट का वाचविता आली नाही? असा सवाल आमदार देवेंद्र भुयार यांनी केला. महाविकास आघाडी सरकार स्थापनेवेळी शेट्टी यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले.आमदार भुयार यांना ‘स्वाभिमानी’मधून बाजूला केले आहे, याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, राजू शेट्टी यांनी आतापर्यंत ‘सोयीच्या भूमिका’ घेतल्या आहेत. आता पुन्हा भाजपशी जवळीक साधायची आहे. मला निवडून आणल्याचे ते सांगत असले तरी माझ्या मतदारसंघात केवळ सहा तास प्रचार केला. सहा तासांत शेट्टींनी करिष्मा दाखविला असेल तर मग कोल्हापुरात का दिसला नाही.विधानसभेच्या निवडणुकीनंतर शेट्टी यांनी शिष्टमंडळ पाठवून कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी आघाडीचे नेते शरद पवार यांच्याकडे केली होती. मात्र, शेट्टी हे कोणत्याच सभागृहाचे सदस्य नव्हते. त्यांना विधान परिषदेवर घेऊन कॅबिनेट मंत्री करणे शक्य नसल्याने विधानसभा सदस्य म्हणून मला राज्यमंत्री देण्याची तयारी शरद पवार यांनी दाखविली होती. मात्र, त्यांनी राज्यमंत्री पदाचा विषय बाजूला ठेवून, काहीच नको, संपूर्ण कर्जमाफी करा, असे त्यांनी आघाडीला सांगितल्याचे आमदार भुयार यांनी सांगितले.
..तर राजू शेट्टींचा करिष्मा कोल्हापुरात का दिसला नाही? आमदार देवेंद्र भुयार यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 1:25 PM