कोल्हापूर : काँग्रेसचे शाहू छत्रपती यांच्यावर इतकं प्रेम होतं. तर मग त्यांना नुकत्याच झालेल्या निवडणुकीत बिनविरोध राज्यसभेवर का पाठवलं नाही असा सवाल महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांनी उपस्थित केला आहे. मंडलिक यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्यांना हा प्रश्न उपस्थित केला.मंडलिक म्हणाले, केवळ आपल्याला कोणाला उभं रहायचं नाही म्हणून या वयात शाहू छत्रपती यांना गावोगावी फिरायला लावणं हे दुर्देवी आहे. त्यांना जर राज्यसभेवर बिनविरोध पाठवलं असतं तर तो कोल्हापूरच्या गादीचा सन्मानच झाला असता. शाहू छत्रपती यांच्याविषयी आम्हांला आदर आहे. परंतू त्यांना बळी देण्यासाठीच उभं केलं गेलं काय अशी शंका माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे.खासदार धनंजय महाडिक म्हणाले, संजय मंडलिक निवडून येणं ही आता आमची भाजपची गरज आहे. कारण आम्हांला नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांना पंतप्रधान करायचं आहे. त्यामुळे शिवसैनिकांच्या दोन पावलं पुढं भाजपचे कार्यकर्ते असले पाहिजेत.यावेळी प्रदेश सचिव महेश जाधव यांनी मात्र मंडलिक यांना कामे न झाल्याबद्दल स्पष्ट विचारणा केली आणि याबद्दल माफी मागतानाच मध्यंतरी अडीच वर्षे आम्ही महाविकास आघाडीसोबत असल्याने काही गोष्टी राहिल्याचे स्पष्ट केले. यावेळी भाजपचे शहरासह ग्रामीण भागातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इतकं प्रेम होतं तर शाहू छत्रपतींना बिनविरोध राज्यसभा का दिली नाही, संजय मंडलिकांचा सवाल
By समीर देशपांडे | Published: March 29, 2024 1:34 PM