‘ज्याचा माल त्याचा हमाल’ याबाबत ताराबाई पार्कातील पालकमंत्री पाटील यांच्या अजिंक्यतारा या कार्यालयात साखर व्यापारी व माल वाहतूकदारांची सोमवारी बैठक घेतली.
जोपर्यंत ज्याचा माल त्याचा हमाल याबाबत निर्णय होत नाही. तोपर्यंत किमान महिनाभर साखर व्यापाऱ्यांनी भरणीचे पैसे हमालांच्या मुकादम अथवा कंत्राटदारांच्या बँक खात्यात जमा करावेत. याबाबत येत्या काही दिवसांत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी बोलून मंत्रालयात वाहतूकदार व व्यापाऱ्यांची बैठक घेऊन त्यात तोडगा काढू, असे आश्वासन पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले. मात्र, यावर समाधान न झाल्याने वाहतूकदारांनी माल न भरण्याचा निर्णय कायम ठेवला. आज, मंगळवारी ऑल इंडिया शुगर ट्रेडिंग असोसिएशनचे प्रफुल्ल विठलानी व अन्य चार महत्त्वाच्या संघटनांशी व्हिडिओ काॅन्फरसिंगद्वारे चर्चा केली जाणार आहे.
यावेळी वाहतूकदारांतर्फे लाॅरी ऑपरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव, सांगली ट्रान्स्पोर्ट असोसिएशनचे बाळासाहेब कलशेट्टी, स्वाभिमानी वाहतूकदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शंकर चिंचकर, सातारा माल व प्रवासी वाहतूक संघटना जिल्हाध्यक्ष प्रकाश गवळी, कऱ्हाड ट्रान्स्पोर्ट असोसिएशनचे अल्ताफ सवार, सोलापूर ट्रान्स्पोर्ट असोसिएशनचे उदय चाकोटे, पुणे ट्रान्स्पोर्ट असोसिएशनचे राम कदम पदाधिकारी तसेच साखर व्यापाऱ्यांतर्फे कोल्हापूर, कऱ्हाड, सांगली, शुगर मर्चंट असोसिएशनचे सचिव शेमल जैन, भावेश ठक्कर, अतुल शहा, गौतम शहा, प्रशांत गायकवाड, पंकज जैन आदी उपस्थित होते.