कोल्हापूर : कृषी विद्यापीठाच्या शेंडा पार्क येथील खुल्या जागेतील वाळलेल्या गवताला मोठी आग लागून त्यामध्ये सामाजिक वनीकरणाचे शतकोटी योजनेतील वृक्षारोपण जळाले. सुमारे ३० हेक्टरपैकी २० हेक्टर जागेवर आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले.
सकाळी दहा वाजता लागलेली आग सुमारे पाच तासाहून अधिक काळ सुरू होती. महापालिका अग्निशमन दलाच्या चार बंबांनी अथक् परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली.शेंडा पार्क येथे सुमारे ३० हेक्टर जागेत सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने तीन वर्षापूर्वी शतकोटी योजनेअंतर्गत लाखो रुपये खर्चून वृक्षारोपण केले होते. झाडे पाच फुटाहून उंच झाली होती. येथे वाळलेले गवत कापणीचे कामही सुरु होते.
सोमवारी पूर्वेच्या ओढ्याकडून आग लागली. वाळलेले गवत असल्याने क्षणातच आग वाऱ्यामुळे पसरली. धुराचे लोट रस्त्यापर्यंत पोहचले. महापालिकेच्या अग्निशमन दलाचे चार बंब तातडीने दाखल झाले. पण घटनास्थळापर्यंत ते नेण्यास रस्ता नसल्याने अडचणी आल्या. खडकाळ जागेतून ही वाहने आत नेली. त्याद्वारे ही आग आटोक्यात आणली.
खडकाळ जागेतून अग्निशमनचे बंब आत नेल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले. नागरिक, विद्यार्थी तसेच वनीकरणाचे अधिकारी, कर्मचारीही आग विझविण्यासाठी धावले. आगीत लाखो रुपयांची झाडे जळाली. अग्निशमनचे प्रभारी स्थानक अधिकारी जयवंत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली नऊ जवानांनी चार बंबांसह शर्थीचे प्रयत्न केले.पक्षी, सरपटणारे प्राणी होरपळलेआगीमध्ये अनेक पक्षी व सरपटणाऱ्या प्राण्यांचा होरपळून मृत्यू झाला. गवत जळून खाक झाल्यानंतर त्यामध्ये अनेक पक्षी, सरपटणारे प्राणी मृतावस्थेत सापडले.
ही आग कोणी वाईट हेतूने लावली का, यामध्ये किती लाखाचे वृक्ष जळून खाक झाले, याची चौकशी करण्यात येत आहे.- एस. बी. देसाई, वनपाल.