प्रदीप शिंदे ।कोल्हापूर : स्मार्टफोन, इंटरनेटच्या युगात वाचनसंस्कृती धोक्यात आली आहे, असे विधान सर्रास केले जाते. प्रत्यक्षात मात्र बदलत्या आधुनिक काळात वाचनसंस्कृती आणखी मजबूत करण्यासाठी वाचनकट्टा संस्थेकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘पुस्तकांचा शोध’ हा व्हॉट्सअॅप गु्रप चालविला जात आहे. ग्रंथालय हे वाचनसंस्कृतीचे पारंपरिक माध्यम असले तरी याला पूरक असे काम या उपक्रमामुळे होत आहे.
सोशल मीडियावरील व्हॉटस्अॅपच्या ग्रुपच्या माध्यमातून केवळ पुस्तकांशी संबंधित पोस्ट करण्यासाठी हा वाचनप्रेमी ग्रुप तयार केला आहे. पुस्तकाच्या माहितीसह इतर साहित्यकृतींवर चर्चा, नव्या-जुन्या पुस्तकांची माहिती, संदर्भ त्यासंबंधी पोस्ट करून विचारणा केली जाते. त्याला ग्रुपवर जाणकारांकडून मार्गदर्शनही मिळते. कुणाला एखाद्या विषयावर वाचन करायचे असेल तर तो विषय पोस्ट केली जाते. त्यानंतर त्याविषयीच्या सविस्तर माहिती दिली जाते. त्यामुळे व्हॉटसअॅपवर हा ग्रुप वाचन चळवळीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल.दहा दिवसांत वाचलेल्या पुस्तकांविषयी चर्चाअनेक पुस्तकप्रेमी दहा दिवसांतून एका रात्री आठ ते दहा या वेळेत वाचलेल्या पुस्तकांविषयी आपले अनुभव सांगतात. ग्रुपवर पुस्तकाचा फोटो, प्रकाशक आणि इतर माहिती पोस्ट करतात. त्यामुळे एका पुस्तकाच्या अधिकाधिक माहितीचे संकलन नकळतपणे होते. महत्त्वाचे म्हणजे ग्रुपवर कोणतेही फॉरवर्ड मेसेज किंवा ग्रुप नियमबाह्य कृतीला प्रतिबंधक घातलेला आहे.
प्रत्यक्ष भेटून गप्पांची मैफल...आजच्या धावपळीच्या आयुष्यात वाचनप्रेमी मित्र भेटणे तसे अवघडंच, अशा माध्यमातून मिळालेल्या लोकांशी पुस्तकांविषयी मनसोक्त चर्चा करतात.‘पुस्तकाचा शोध’ या उपक्रमामुळे सोशल मीडियाचा सकारात्मक वापर तर होतोच शिवाय वाचनसंस्कृती वृद्धिंगत होत आहे. एखादे पुस्तक प्रत्येक जण आपापल्या दृष्टिकोनातून वाचतो. ग्रुपवर चर्चा करतो. त्यामुळे ते पुस्तक आकलन होण्यास आणखी मदत मिळते. नवनवीन पुस्तकांच्या शोधात असणाऱ्या तरुणवर्गातील वाचकांची संख्या या उपक्रमामुळे वाढणार आहे. या गु्रपवर राज्यभरातील शंभरहून अधिक युवक सक्रिय आहे.- युवराज कदम, संकल्पक वाचनकट्टा