संतोष पाटील, कोल्हापूर : माथेफिरूने राष्टÑीय महापुरुषांच्या छायाचित्रांचे विद्रुपीकरण करून फेसबुकवर अपलोड केल्याने संपूर्ण समाजस्वास्थ्यच बिघडले. लोकांची डोकी फिरविण्याचे इतके सोपे हत्यार सहज उपलब्ध झाल्याने फेसबुक व वॉटस् अॅप सारख्या सोशल मीडियाच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. याचा अनुभव कोल्हापूरकरांनी शनिवारी रात्री व रविवारी दिवसभर अनुभवला. सुरुवातीस दहा-बारा लोकांच्या टोळक्याचे रूपांतर पाच-सहा हजारांच्या जमावात निव्वळ वॉटस् अॅपवर फिरणार्या मेसेजमुळेच झाले. सोशल मीडियातील मजकुरांमुळे दंगल होण्याची ही पहिलीच वेळ असली तरी ही सुरुवात आहे. यापुढे अशा घटना रोखणे सध्यातरी ‘सायबर सेल’च्या हाताबाहेर असल्याने भविष्यात समाजस्वास्थ्य आणखीन धोक्यात असल्याचे जाणकारांचे मत आहे. समाजकंटक माथेफिरूने शिवाजी महाराज व बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्रांचा वापर करीत आक्षेपार्ह चित्रे बनवून ती ‘फेसबुक’वर टाकली. शनिवारी दुपारी टाकलेली ही छायाचित्रे तासाभरात राज्यात चांद्यापासून बांद्यापर्यंत पोहोचली. यानंतर लगेच आक्षेपार्ह छायाचित्रांच्या सोबतीला माथी फडकावणारा मजकूर फिरू लागला आणि पहिला मेसेज टाकून निवांत बसलेल्या माथेफिरूचे काम समाजातील शहाण्या वर्गाने सोपे केले. सायंकाळी नऊ वाजेपर्यंत कोल्हापूर शांत होते. दहानंतर वॉटस् अॅपवर आक्षेपार्ह छायाचित्रांच्या जोडीला ‘आता सोडायचं नाही’ अशी डोकी फिरवणारा मजकूरही भराभर फिरू लागला. रात्री अकराच्या सुमारास शिवाजी चौकात दहा ते बारा तरुणांचे टोळके जमले. असे मेसेज वाचून यामध्ये सामील होण्यासाठी तरुणांचे जथ्थेच्या जथ्थे येऊ लागले. शिवाजी चौकात पाच ते सहा हजारांचा जमाव जमला. ‘जमावाला डोके नसते’ या उक्तीप्रमाणे जमावाने तुफान दगडफेक करीत थैमान घातले. ‘वॉटस् अॅप’वर येणारे मेसेज त्याचा दर्जा व विश्वासार्हता न तपासताच ते सर्रास फॉरवर्ड केले जातात. या आपसूक होणार्या देवाण-घेवाणीचा फायदा घेत समाजस्वास्थ्य बिघडवणार्या घटनांची ही नांदी आहे. मात्र, अशा घटना भविष्यात घडू नयेत, यासाठी मात्र कोणतीही यंत्रणा सध्यातरी उपलब्ध नाही. सायबर सेलवर मर्यादा पोलिसांच्या सायबर सेलकडून अशा घटनांचा छडा लावला जातो. मात्र, घटनेची तीव्रता व आलेल्या तक्रारीनंतरच सायबर सेल आयपी अॅड्रेसवरून अशा घटनांमागील विकृत प्रवृत्तीपर्यंत पोहोचतात. फेसबुकवरील मजकु रांबाबत हे शक्य आहे. मात्र, वॉटस अॅप व निंबस सारख्या सोशल मीडियातील मजकुराचा सहज छडा लावणे शक्य नाही. - संदीप पाटील, आयटी तज्ज्ञ
‘सोशल मीडिया’ने समाजस्वास्थ्य धोक्यात
By admin | Published: June 02, 2014 1:14 AM