कोल्हापूर : यंदाचा किर्लोस्कर सामाजिक बांधीलकी पुरस्कार येथील बालकल्याण संकुलातील शिशुगृह विभागास देण्यात आला. किर्लोस्कर आॅईल इंजिन्स यांनाही यावेळी गौरविण्यात आले. ‘संवेदना जागर’चे स्वयंसेवक पर्यावरणपूरक कार्यक्रम करणारे अश्फाक मकानदार, सुनीता मेंगणे, कृष्णा गावडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. संवेदना जागर २०२० चा सांगता सोहळा आणि किर्लोस्कर सामाजिक बांधीलकी पुरस्कार वितरण शाहू स्मारक भवनात झाले.जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक आणि किर्लोस्कर आॅईल इंजिन्स तर्फे संवेदना जागरच्या माध्यमातून कोल्हापुरात एचआयव्ही एड्स जनजागृतीचे प्रभावीपणे काम सुरू असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले. ते म्हणाले,‘राज्यातील अन्य जिल्ह्यांपेक्षा अत्यंत संवेदनशीलपणे एचआयव्ही एड्स जनजागृतीचे काम कोल्हापुरात प्रभावीपणे सुरू आहे. एड्ससारख्या गंभीर विषयाचे हे पथक लोककलेच्या माध्यमातून प्रबोधन करत आहे. त्याचबरोबर एलजीबीटीचे कामही उत्तमपणे करत आहेत.महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले,‘विविध उपक्रमांनी एचआयव्ही एड्सबाबत सातत्यपूर्ण जाणीव जागृती व्हावी. जिल्ह्यात एचआयव्हीवर नियंत्रण आणण्यासाठी अधिक प्रभावीपणे काम करू. किर्लोस्कर आॅईलचे प्रकल्प प्रमुख चंद्रहास रानडे म्हणाले, किर्लोस्करच्या माध्यमातून सुरू असलेला संवेदना जागर ही आता सामाजिक बांधीलकी न राहता ते ऋणानुबंध झाले आहेत. ही चळवळ भविष्यात वृद्धिंगत होईल. यावेळी अभिनेत्री स्मिता शेवाळे यांनी मनोगत व्यक्त केले.
जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. शरद आजगेकर यांनी आभार मानले. आरोग्य उपसंचालक डॉ. हेमंतकुमार बोरसे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी पाटील, सामाजिक बांधीलकी अधिकारी शरद अजगेकर, एन.एम.पी.चे गौतम ढाले, सामाजिक कार्यकर्त्या साधना झाडबुके, सुरेश शिपूरकर उपस्थित होते.