कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाचे समाजकल्याण निरीक्षक सुनील विलास पाटील (रा.बाचणी ता. करवीर) हे सोमवार दि. २२ आक्टोंबरपासून बेपत्ता झाले आहेत. त्यांचे बंधू सागर पाटील यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात वर्दी दिली आहे.रीतसर अधिकाऱ्यांचे पत्र न घेता सुनील पाटील हे परस्पर सोमवारी हालचाल रजिस्टरमध्ये आपण पुण्याला जात असल्याची सकाळी ६ वाजता नोंद करून गेल्याचे गुरूवारी स्पष्ट झाले आहे.सुनील पाटील हे गेली तीन वर्षे जिल्हा परिषदेकडे समाजकल्याण निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. ते मुळचे राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाचे कर्मचारी आहेत. त्यांनी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता ५ आक्टोंबरपासून रजा घेतल्याचे सांगण्यात आले.रजेवर असलेले पाटील सोमवार दि. २२ रोजी सकाळी ६ वाजता जिल्हा परिषदेत येऊन कार्यालय उघडून त्यावर हालचाल रजिस्टरमध्ये कामासाठी पुण्याला जात असल्याचे नोंद करून गेले होते. ते सोमवारी परत आले नाहीत.
मंगळवारी त्यांना फोन केल्यानंतर त्यांनी बसमध्ये आहे. कोल्हापुरला येत असल्याचे सांगितले. मात्र तरीही ते मंगळवारी आले नाहीत. नातेवाईक, पाहुणे यांच्याकडे चौकशी केल्यानंतर अखेर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची वर्दी देण्यात आली आहे.