कोल्हापूर : ‘पाणी वाचवा, आरोग्य, पर्यावरण रक्षण, लेक वाचवा’ आदी विषयांबाबत शाहिरी पोवाडा कलामंचचे शाहीर रंगराव पाटील यांनी रविवारी बिंदू चौकात प्रबोधन केले. निमित्त होते समता दिंडीचे (चित्ररथ) आगमन.समाजकल्याण विभागातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त राज्यात समता दिंडीचे आयोजन केले आहे. कोल्हापुरात रविवारी सकाळी समता दिंडीचे बिंदू चौकात आगमन झाले. याठिकाणी समाजकल्याण विभागातर्फे शाहीर पाटील यांचा कार्यक्रम घेण्यात आला. त्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या हस्ते झाले. यावेळी समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विजय गायकवाड, वरिष्ठ समाजकल्याण निरीक्षक संतोष चिकणे, ‘बार्टी’चे प्रकल्पाधिकारी गणेश सव्वाखंडे, अॅड. पंडितराव सडोलीकर, प्रा. विश्वासराव देशमुख, बाळासाहेब भोसले, आदींसह समतादूत उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात शाहीर पाटील यांनी बुद्धवंदनेने केली. यानंतर त्यांनी राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट, त्यांच्या सामाजिक कार्यावरील पोवाडे सादर केले तसेच संविधानाचे महत्त्व पटवून देण्यासह त्यांनी पाणी वाचवा, लेक वाचवा आणि समता, न्याय आदी विषयांबाबत प्रबोधन केले. शाहीर पाटील यांना शाहीर बाळासाहेब खांडेकर, सखाराम चौगुले, कृष्णात पाटील, लक्ष्मण पाटील, बाळू पाटील, संजय गुरव, रमेश कांबळे, गौतम कांबळे यांनी साथ दिली. रणजित कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)
शाहिरीतून समाजप्रबोधन
By admin | Published: February 15, 2016 1:04 AM