कोल्हापूर : पेठवडगाव (ता. हातकणंगले) येथील लाईफ इन्शुरन्स कंपनीचे कार्यालय कटरने फोडून घरफोडी केलेल्या संशयितास स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने राष्ट्रीय महामार्गावर कागल जवळील लक्ष्मी टेकडी परिसरात अटक केली. राजकुमार पंडीत विभुते (वय ४२ रा. बोरामणी, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर) असे अटक केलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेले साहित्य, इन्शुरन्स कंपनीचे चेकबुकसह मोटारकार असा सुमारे ४ लाख ३४ हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त केला.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. १२ जुलैला पेठवडगाव येथील एलआयसी या विमा कंपनीचे कार्यालय चोरट्याने गॅस कटरचा वापर करुन फोडले अन् सुमारे ६ लाख ८० हजाराची रोकड, चेकबूक आदी साहित्य चोरी केले होते. घरफोडीप्रकरणातील संशयित राजकुमार विभुते हा अलिशान मोटारकारने पुणे ते बंगळूरू महामार्गावरुन जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला मिळाली. पथकाने सोमवारी सकाळी सापळा रचून त्याला लक्ष्मीटेकडी परिसरात पकडले. मोटारीची झडती घेतली असता घरफोडीसाठी गुन्ह्यात वापरलेली हत्यारे तसेच एलआयसी कंपनीचे चेकबुक व मोटारकार जप्त केले. पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर संशयित विभूते याने पेठवडगाव येथील एलआयसी कार्यालय फोडल्याची कबूली दिली.ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण चे संजय गोर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पो. नि. शिवानंद कुंभार, उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अमोल कोळेकर, नितीन चोथे, अजय वाडेकर, सुनिल कवळेकर, ओंकार परब, हिंदूराव केसरे, रामचंद्र कोळी, सुरेश पाटील, महिला पोलीस वैशाली पाटील शहानाज कनवाडे यांनी केली.संशयिताकडून जप्त गुन्ह्यातील हत्यारेपोलिसांनी संशयित विभूतेच्या मोटारीची झडती घेतली असता घरफोडीवेळी वापरलेले तीन गॅस सिलींडर, नोजल, रेग्युलेटर, रबरी पाईपसह तयार केलेला सेट, दोन कटर, हेक्सा, ग्राईडर कटर मशीन, लोखंडी कटावणी, कोयता, बॅटरी, चेकबुक तसेच मोटारकार असा मुद्देमाल जप्त केला.
कोल्हापुरातील घरफोडीप्रकरणी सोलापूरचा सराईत गुन्हेगार गजाआड; रोकड गायब मात्र, ४ लाखांचा मुद्देमाल जप्त
By तानाजी पोवार | Published: August 01, 2022 2:48 PM