कोल्हापूूर : सोलापूरमध्ये किमान आधारभूत किमतीने खरेदी करून ठेवलेल्या मक्याच्या शिल्लक साठ्याचे करायचे काय, असा प्रश्न पडल्याने आता तो रेशनवर देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जिल्ह्यातील महामार्गालगतच्या पाच तालुक्यांतील प्राधान्य व अंत्योदय लाभार्थ्यांना प्रतिमाणसी एक किलो एक रुपयांना याप्रमाणे मका केवळ पुढील महिन्यासाठी दिला जाणार आहे. मका दिल्याने गव्हाचे प्रमाण एक किलोने कमी करण्यात आले आहे. उर्वरित सात तालुक्यांत गहू, तांदूळ असे प्रतिमाणसी ३ किलो असे वाटप कायम राहणार आहे.
सोलापुरात मोठ्या प्रमाणावर मका पिकतो; त्यामुळे तेथील खाद्यसंस्कृतीदेखील तशीच आहे. या उलट कोल्हापुरात मका हे रोजच्या आहारातील धान्य नाही. जनावरांसाठी खाद्य म्हणूनच जास्त करून मक्याचा वापर येथे केला जातो. गहू, तांदूळ, ज्वारी यांच्याच रोट्या कोल्हापुरात केल्या जातात, मक्याची नाही. तरीदेखील शासनाने सरकारी गोदामात पडून असलेल्या मक्याची विल्हेवाट लावायची म्हणून तो रेशनवर वाटून संपवायचा निर्णय घेतला आहे. पुढील महिन्यापासून तो वाटावा, असे नियोजन व त्याप्रमाणे धान्य सरकारी गोदामाकडे पाठवण्यास सुरुवात झाली आहे. यावरून रेशन दुकानदारांमध्ये मात्र नाराजीचा सूर दिसत आहे.
कोल्हापुरात सोलापूरहून मका आणण्यासाठी वाहतूक खर्च जास्त होणार नाही, याची दक्षता घेत जवळचेच असलेले शिरोळ, हातकणंगले, पन्हाळा, करवीर, कागल या पाच तालुक्यांची निवड करून तेथील लाभार्थ्यांना हा मका दिला जाईल याचे नियोजन केले आहे. उर्वरित गडहिंग्लज, चंदगड, आजरा, राधानगरी, भुदरगड, शाहूवाडी, गगनबावडा या डोंगराळ तालुक्यांत मात्र आता सुरू असलेले गहू ३ किलो, तांदूळ ३ किलो असे वाटप कायम राहणार आहे.
बॉक्स
प्रती माणशी १ किलो मका १ रुपये दराने मिळणार आहे. एका कुटूंबात पाच व्यक्ती आहेत, तर त्यांना ५ किलो मका मिळणार आहे. गहू ३ ऐवजी २ किलो, तांदूळ ३ किलो असे एकूण ६ किलो प्रती माणशी धान्य मिळणार आहे.
बॉक्स
शासनाकडून जिल्ह्यासाठी १२ हजार ७३ क्विंटल मक्याचा पुरवठा
बॉक्स
तालुकानिहाय उपलब्ध मका (क्विटलमध्ये)
करवीर ३२००
पन्हाळा १७९०
हातकणंगले २९४६
शिरोळ २४९२
कागल १६४५
एकूण: १२ हजार ७३ क्विंटल
बॉक्स
रेशनचा लाभ घेणारे लाभार्थी
प्राधान्यधारक: ५ लाख ६ हजार
अंत्योदय: ६२ हजार
प्रतिक्रीया
जिल्ह्यातील १२ पैकी केवळ पाच तालुक्यांमध्येच केवळ एका महिन्यासाठी मका रेशनवर दिला जाणार आहे. त्याच्या पुरवठ्याचे नियोजन केले आहे. एप्रिलपासून नियमितपणे धान्य पूर्ववत वाटप होणार आहे.
दत्तात्रय कवितके,
जिल्हा पुरवठा अधिकारी, कोल्हापूर
प्रतिक्रीया
गहू मिळत असल्याने निदान चपात्या तरी करुन खाता येत होत्या. आता मका देणार आहे, असे ऐकले आहे. मक्याचा धान्य म्हणून वापर करता येत नाही, मग मिळालेल्या मक्याचे आता करायचे काय याचे उत्तरही सरकारनेच द्यावे.
आक्काताई नलवडे, लाभार्थी