कोल्हापूर : कोणत्याही गायकाची नक्कल न करता स्वत:च्या आवाजात रसिकश्रोत्यांना तृप्त करणारे कोल्हापुरातील गायक हबीबभाई सोलापुरे कर्करोगाला धैर्याने सामोरे गेले.
प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेच्या व्यासपीठावर केवळ गाण्याच्या अट्टहासामुळे बोनस आयुष्य जगलेल्या हबीबभाई सोलापुरे यांचे (वय ६३) गुरुवारी निधन झाले. त्यांना गुरुवारची संगीत मैफल रद्द न करता प्रतिज्ञा नाट्यरंगने आदरांजली वाहिली. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित मुली, जावई, सासू असा परिवार आहे.गायनाचे शास्त्रशुद्ध शिक्षण न घेतलेल्या हबीबभार्इंना लहानपणापासूनच गाण्यांचा छंद होता. रेडिओवरच्या गाण्यांची शेकडो पारायणे करणाऱ्या हबीबभार्इंचा टेलरिंग व्यवसाय होता. मशीनच्या आवाजाशी एकरूप होत सातत्याने त्यांचा रियाज सुरूच असायचा. अर्धांगिनी, कन्या आणि तरुण मुलाची त्यांना उत्तम साथ होती. त्यांच्यासाठी त्यांनी स्वत:चे घर घेतले; मात्र तरुण मुलाचे २००६ मध्ये अपघातात निधन झाले.
पुत्रवियोगाचे दु:ख असतानाच सन २०११ मध्ये हबीबभार्इंना कर्करोगाने ग्रासले; पण हबीबभार्इंच्या पत्नी आणि मुलींनी तसेच नातेवाईक-मित्रांनी हिंमत न हरता हबीबभार्इंना भक्कम मानसिक आधार दिला. आजारपणामुळे काम झेपत नसल्याच्या विवंचनेतून हबीबभार्इंना त्यांचा गायनाचा छंद उपयोगी ठरला.प्रशांत जोशी यांनी प्रतिज्ञा नाट्यरंगमार्फत हबीबभार्इंना रोजच आनंद मिळावा म्हणून २ एप्रिल २०१९ पासून कोल्हापुरात अखंड ३६५ दिवस ३६५ संगीत मैफलींचे आयोजन केले. १५ आॅगस्ट २०१९ रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्ताने आयोजित देशभक्तीपर मैफलीचे वेळी तब्येतीचा त्रास होत असूनसुद्धा हट्टाने त्यांनी देशभक्तीपर गीते गायिली. मैफलींच्या १७७ व्या दिवसांपर्यंत त्यांनी गाणी गायिली. त्यानंतर गेले २५ दिवस आजारपणामुळे ते या मैफलीस उपस्थित राहू शकले नाहीत.