शिरोली : कासारवाडी येथील जेनेसिस इंजिनिअरिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शेतकरी, सामान्य नागरिक यांना उपयोगी ठरेल असा सोलर ड्रायर तयार केला आहे. या उपकरणाला ‘केआयटी’च्या प्रदर्शनात पुरस्कारदेखील मिळाला आहे.महाविद्यालयातील अभियांत्रिकी विभागातील चंदन महाडिक, प्रसाद पाटील, दिग्विजय शिंदे, अक्षय ओतारी, अजय कोळसे-पाटील यांनी भाजीपाला, फळे, अन्नधान्य, लाकूड, वस्त्रोद्योग, डेअरी पदार्थ वाळविण्यासाठी ‘सोलर ड्रायर’ हे उपकरण तयार केले. ऊर्जा कमतरतेवर मात करण्यासाठी आणि अपारंपरिक ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर कसा करावा, याबाबत जेनेसिस महाविद्यालयात तज्ज्ञ प्राध्यापकांची विविध व्याख्याने आयोजित केली होती. त्यातूनच प्रेरणा घेत या विद्यार्थ्यांनी हे उपकरण तयार केले आहे. या उपकरणामुळे फळे, भाजीपाला यातील आर्द्रता काढून टाकून सौरऊर्जेच्या माध्यमातून ती जास्तीत जास्त दिवस टिकविणे शक्य होणार आहे. तसेच विजेचा वापर कमी होऊन वीज बचतीसह खर्चही वाचेल. ‘केआयटी’मध्ये झालेल्या प्रदर्शनात याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.११० प्रोजेक्टमध्ये हे उपकरण पुरस्कार प्राप्त ठरले आहे. या उपकरणाची उपयुक्तता पाहून त्याची व्यावसायिक निर्मिती करण्यात यावी, अशी सूचना प्रदर्शनावेळी अनेक जाणकारांनी दिली.‘सोलर ड्रायर’ तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांना सांगलीचे जयगृह उद्योगाचे विजय भिडे, महाविद्यालयाचे प्राचार्य एन. व्ही. पुजारी, प्रा. व्ही. टी. मेघराजू, विभागप्रमुख विराज जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. ( वार्ताहर )
‘जेनेसिस’च्या विद्यार्थ्यांनी बनविला सोलर ड्रायर
By admin | Published: April 01, 2016 1:10 AM