कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभागात आयोजित केलेल्या या कार्यशाळेत बी. टेक. अभ्यासक्रमाच्या सुमारे २५० विद्यार्थ्यांना सोलर (सौरऊर्जा) स्टडी लॅम्प बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. टेक्विप उपक्रमांतर्गत त्यांना त्यासाठी आवश्यक साधनांची उपलब्धता करून देण्यात आली. सौरऊर्जेच्या प्रसारासाठी काम करण्याची आणि पर्यावरणाप्रती अहिंसा धर्म बाळगण्याची त्यांना यावेळी शपथ देण्यात आली.विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागात आयआयटी, मुंबई यांच्या सहकार्याने महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीच्या निमित्ताने ‘गांधी ग्लोबल सौरयात्रा’ उपक्रमांतर्गत विद्यार्थी सौरदूत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. तिच्या उद्घाटनप्रसंगी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, स्वच्छ ऊर्जा आणि ऊर्जेच्या संदर्भात स्वयंपूर्णता हा जगातील प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. त्यासाठी युवकांनी अपारंपरिक ऊर्जेचा वापर करून गांधीजयंतीच्या निमित्ताने पर्यावरणाप्रती अहिंसा व प्रेम प्रदर्शित करण्याची गरज आहे.तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. जे. एस. बागी म्हणाले, गांधी ग्लोबल सौरयात्रेतून जगभरात सौरऊर्जेबाबत जागृती तसेच अपारंपरिक ऊर्जा वापरण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा उद्देश आहे. याद्वारे अत्यल्प खर्चात, विश्वासार्ह आणि टिकाऊ सौर उपकरणांची निर्मिती शक्य आहे.
या कार्यक्रमास प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे उपस्थित होते. प्रवीण प्रभू यांनी कार्यशाळेचे समन्वयक म्हणून काम पाहिले.८० देशांतील चार हजार केंद्रांमध्ये आयोजनकुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, जगभरातील विद्यार्थ्यांमध्ये जाणीवजागृती करण्यासाठी आयआयटी, मुंबईने गांधीजयंतीच्या निमित्ताने केवळ देशातच नव्हे, तर जगभरातील ८० देशांतील सुमारे चार हजार केंद्रांमध्ये ग्लोबल सौरयात्रेचे आयोजन केले. त्यामध्ये विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागाचा समावेश करण्यात आला, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन सौरऊर्जेचा जनसामान्यांचे जीवन सुखकर करण्यासाठी कसा वापर करता येईल, या दृष्टीने या कार्यशाळेचा लाभ घ्यावा. जीवनातही अपारंपरिक ऊर्जाक्षेत्रात संशोधनासाठी सिद्ध व्हावे.