कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती कळंबा कारागृहात कैद्यांकडे मोबाईल, गांजा सापडलेले प्रकरण राज्यभर गाजले असतानाच, बुधवारी पुन्हा कारागृहात गांजा प्रकरण चव्हाट्यावर आले.
कारागृहात सुरक्षेसाठी नेमलेल्या शिपायानेच तिघा शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांना गांजा पुरवल्याचे उघड झाले. त्याप्रकरणी कारागृहातील तपासणी पथकाला चौघांकडे गांजासदृश अमली पदार्थ व १५०० ची रोकड मिळाली. शिपायासह एकूण चौघांवरही रात्री उशिरा जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला.इंद्रजित पाचुराम बलोटीया, छेदीलाल ऊर्फ शिवा रामलाल निर्मळ, सुबोध प्रसाद ऊर्फ अनिल ऊर्फ छोटू जगदीश मेहता अशी तिघा कैद्यांची नावे असून, शिपाई सतीश दगडू गुंजाळ (सर्व रा. कळंबा कारागृह) असे गुन्हा दाखल झालेल्या चौघांची नावे आहेत. त्यांच्याकडून १५०० ची रोकड व गांजासदृश अमली पदार्थांच्या छोट्या आठ पुड्या विशेष पथकाने जप्त केल्या.कळंबा मध्यवर्ती कारागृहात गंभीर गुन्ह्यातील आरोपी शिक्षा भोगत आहेत. गेल्या सहा-सात महिन्यांत कारागृहाबाहेरून गांजा, मोबाईल आतील कैद्यांना पुरविल्याच्या तसेच कारागृहात त्याचा वापर झाल्याच्या घटना चव्हाट्यावर आल्या आहेत. त्यामुळे कारागृहाच्या सुरक्षेविषयी प्रश्न निर्माण झाला होता. प्रकरणाची कारागृह प्रशासनाकडून गंभीर दखल घेण्यात आली. त्याप्रकरणी काही कैद्यांसह एकूण आठजणांवर मोक्कांतर्गत कारवाई केली आहे.
हे प्रकरण अद्याप ताजे असतानाच बुधवारी सकाळी कळंबा कारागृहात कैद्यांकडून काही संशयास्पद हालचाली दिसून आल्या. त्यामुळे कारागृह अधीक्षक चंद्रमणी इंदूरकर यांनी नेमलेल्या विशेष पथकाने शिक्षा भोगणाऱ्या तिघा कैद्यांसह कारागृहातील शिपाई यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे गांजासदृश अमली पदार्थाच्या छोट्या-छोट्या आठ पुड्या व पैसे मिळून आले. चौघांवर बुधवारी रात्री उशिरा जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.गांजा बाहेरून आणण्यास शिपायाचे साहाय्यकारागृहातील शिपाई सतीश गुंजाळ हा गांजा बाहेरून कारागृहात आणून कैद्यांना पुरवत असल्याची माहिती कैदी छेदीलाल ऊर्फ शिवा निर्मळ यांनी कारागृहातील तपासणी पथकास दिली.तिघेही कैदी खून प्रकरणातील आरोपीबुधवारी अंगझडतीत गांजा सापडलेले तिघेही कैदी विविध ठिकाणी खून केल्याप्रकरणी कारागृहात शिक्षा भोगत असल्याचे अधीक्षक इंदूरकर यांनी सांगितले.
सुरक्षेसाठी नेमलेल्या शिपायाकडून असे गैर कृत्य घडणे गंभीर आहे, त्या शिपायासह कैद्यांवर पोलीस कारवाई करतीलच; पण संबंधित शिपायाबाबत खातेनिहाय चौकशीबाबतचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवू.- चंद्रमणी इंदूरकर,अधीक्षक, जिल्हा मध्यवर्ती कळंबा कारागृह, कोल्हापूर.