इचलकरंजी : येथील आसरानगरमध्ये गेल्या चार वर्षांहून अधिक काळ धूळ खात पडलेल्या घनकचरा व्यवस्थापनाची यंत्रसामग्री नगरपालिकेकडून चालू करण्याच्या हालचाली चालू झाल्या आहेत. त्यामुळे दररोज शंभर टन कचऱ्यावर प्रक्रिया होणार असून, शहराबरोबरच कचरा डेपोवरील कचऱ्याची वेगाने निर्गत लागण्याची दाट शक्यता आहे.शहर व परिसरामध्ये दररोज साधारणत: ८० ते १०० टन कचरा जमा होतो. आसरानगरमधील कचरा डेपोमध्ये हा कचरा गेले काही वर्षे एकत्रित केला जात असून, याठिकाणी उभारण्यात आलेला घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प गेल्या चार वर्षांपासून बंद आहे. हा प्रकल्प मुंबई येथील हायड्रोयर टेक्नो या कंपनीकडून चालविला जात होता. या प्रकल्पामध्ये नगरपालिका २५ टक्के व मक्तेदार ७५ टक्के अशी भागीदारी होती. गेल्या चार वर्षांपेक्षा अधिक काळ हा प्रकल्प बंद पडला. परिणामी, कचरा डेपोवर मोठ्या प्रमाणावर कचरा साचूू लागला आहे. त्याची विल्हेवाट लागत नसल्याने आणि डेपोतील कचऱ्याला वारंवार आग लागण्याचे प्रकार होत असल्याने आसपासच्या परिसरामधील नागरिकांना त्याचा त्रास होतो. म्हणून कचरा डेपोतील कचरा शहरालगत असलेल्या काही रस्त्यांमध्ये भर करण्यासाठी आणि शहापूर येथील खण बुजविण्यासाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. याचाही अद्याप निर्णय लागलेला नाही. म्हणून मक्तेदाराला बीओटी तत्त्वावर दिलेला हा प्रकल्प ताब्यात घेऊन तो स्वत: चालविण्याचा विचार पालिका करीत आहे. त्यासाठी मक्तेदाराला प्रकल्प ताब्यात घेण्याची अंतिम नोटीस देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)पुन्हा घनकचरा प्रकल्पासाठी निविदानगरपालिकेकडे सध्या उपलब्ध असलेला अपुरा अधिकारी व कर्मचारी वर्ग पाहता हा प्रकल्प बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर पुन्हा चालविण्यास देण्याचा विचार नगरपालिका प्रशासन करीत आहे. पालिकेच्या ताब्यात आल्यानंतर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प चालविण्यास देण्याची निविदा मागविण्यासाठी सभागृहामध्ये हा विषय चर्चेसाठी ठेवण्यात येणार आहे. परिणामी घनकचरा व्यवस्थापनाचा हा प्रकल्प पुन्हा चालू होण्यास मदत मिळेल.
घनकचऱ्याचा प्रश्न मार्गी लागणार
By admin | Published: April 30, 2015 9:22 PM