भारत चव्हाणदोन दिवसांपूर्वीची गोष्ट. सहकुटुंब एका गावी जात होतो. वाटेत आदमापूर देवस्थान लागले. दर्शन घेऊन पुढे जाऊ, अशी सूचना आल्यामुळे आम्ही तेथे थांबलो. भरदुपारी कडाक्याचं ऊन आणि प्रचंड उष्मा. अक्षरश: हैराण व्हायची वेळ आली. पुढे पुढे सरकतो तोच दर्शनरांगेकडे लक्ष गेले. प्रचंड संख्येने भाविक दर्शन रांगेत उभे होते. रांग बघूनच आम्ही मुखदर्शनाचा शॉर्टकट शोधला. दर्शन झाले आणि पुढे येतो तोच अंबील घेण्यासाठी पुन्हा मोठी रांग. उगाच उशीर नको म्हणून तिकडे काही गेलो नाही, पण पुढे एका मोठ्या हॉलमध्ये प्रसाद वाटप सुरू होते. तेथील पद्धत बघितली. सगळे कसे सुरळीत सुरू असल्याचे आणि अंबीलीच्या तुलनेने गर्दी कमी असल्याने प्रसादाचा लाभ घ्यावा, असा आग्रह झाला. नको म्हणायचं नाही म्हणून बाहेरील बाजूला असलेली ताटं घेतली आणि प्रसादगृहात प्रवेश केला.अगदी एन्ट्रीला दोन सेवेकरी पाच रुपयांची कुपनं वाटत बसले होते. भाविक पैसे देऊन कुपन घेत होते आणि भोजनगृहात जात होते. तेथे एकूण तीन ठिकाणी सहा सेवेकरी ताटात प्रसाद घालत होते. हजारो भाविक आणि सेवेकरी मात्र अवघे सहा-सात. मला आश्चर्य वाटले. येथे प्रसाद घेणाऱ्या भाविकांनीच ताटे स्वच्छ धुवून ठेवायची पद्धत आहे. त्यामुळे कामे करण्यासही कोणी कर्मचारी दिसले नाहीत. भोजनगृह एकदम स्वच्छ. प्रसाद भरपूर लागेल तेवढा वाढला जात होता. लोक प्रसन्नमनाने त्याचा आस्वाद घेत होते. कोठे कसलीही गडबड, गोंधळ नाही की आदळाआपट नाही. ताटात अन्न तसेच टाकून दिल्याचे कुठेच पहायला मिळाले नाही. लग्नात खुर्च्यांच्या मागे थांबतात तसेही चित्र दिसले नाही. प्रत्येकाकडून स्वयंशिस्त पाळली जात होती.आज-काल राज्यातील अनेक देवस्थानच्या वतीने भाविकांना प्रसाद वाटला जातो. कोठे मोफत, तर कोठे माफक देणगीमूल्य घेऊन प्रसाद दिला जातो. कोल्हापुरातील आदमापूर, अंबाबाई मंदिर, अक्कलकोटचे स्वामी समर्थ मंदिर, शेगावचे गजानन महाराज मंदिर, शिर्डीचे साईबाबा मंदिर, नारायणगावचे बालाजी मंदिर, पावसचे मंदिर अशी काही प्रमुख मंदिर आहेत त्या ठिकाणी प्रसाद वाटप केला जातो. प्रत्येक ठिकाणच्या प्रसादाची चव वेगळी आणि वाखाणण्यासारखी असते. तो खाल्ल्यावर मन तृप्त होते. भाविकांना त्यातून एक आत्मिक समाधान मिळत असते. त्यामुळे प्रसाद ओलांडून कोणी पुढे जात नाही. मंदिरातील हा प्रसाद आणि आता काही कारणांनी घातला जाणारा महाप्रसाद हा भाविकांच्या दृष्टीने श्रद्धेचा विषय आहे; परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचे प्रश्न मनात तयार होतात ते असे - रोज रोज हे कसे शक्य आहे? इतके भाविक प्रसादाचा लाभ घेत असताना गडबड कशी होत नाही? कोण व्यक्ती या प्रसादाकरिता अर्थसाहाय्य करत असतात? नेमकी किती उलाढाल यामध्ये होत असावी? साहित्य जरी कोणी देणगीदारांनी दान दिले तरी ते शिजवून घालणारे हात कसे थकत नाहीत? आश्चर्यच आहे ना?मुळात देवस्थानच्या ठिकाणी असो की अन्य महाप्रसाद असो. तेथे देणगीदारांचे मोठे सहकार्य असते. देवाचे कार्य म्हणून कोणी नाही म्हणतच नाही. अन्न हे पूर्णब्रह्म आहे आणि त्याचे दान केल्यावर आपल्याला पुण्य प्राप्ती होते, असा अनेकांचा समज आहे. प्रसादासाठी मदत करणाऱ्यांना पुण्य मिळणार आणि तो खाणाऱ्यांच्याही पदरी पुण्य पडणार असाच एकंदरीत सर्वांचा समज आहे.त्यामुळे दिवसेंदिवस प्रसाद आणि महाप्रसादाची व्याप्ती वाढत चालली आहे. त्याचे स्वरूपही बदलत चालले आहे. पूर्वी प्रसाद म्हटले की, भात, आमटी, भाजी आणि गव्हाची खीर असे पदार्थ ताटात असायचे, पण अलीकडे मसाले भात, मिक्स भाजी, पुरी, श्रीखंड एवढेच नाही तर भजी, कोशिंबीर, लोणचे, पापडसुद्धा असतात. याला प्रसाद म्हणायचा का असा प्रश्न पडावा इतका बदल झालेला पहायला मिळतो. महाप्रसादाची स्पर्धा वाढल्याचेही बºयाच ठिकाणी दिसून येते. एका गल्लीत दोन हजार लोकांसाठी प्रसाद केला तर त्याच्या पुढील गल्लीत पाच हजार लोकांचा प्रसाद केला जातो. यात मोठे अर्थकारण आहे. देव आणि त्याचे अस्तित्व यावर मतमतांतरे आहेत. तो कोणाला दिसला नाही. त्याने कोणावर सक्तीही केलेली नाही. मात्र, त्याच्या नावावर लोकांच्या मुखात आत्मिक समाधानाचे चार घास पडतात, हेही काही कमी नाही.
समाधानाचे घास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2019 11:59 PM