जयसिंगपूर : कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्या धान्य दुकानदाराला तत्काळ आर्थिक मदत द्यावी. तालुक्यातील सर्व धान्य दुकानदारांना ५० लाखांचे विमा कवच द्यावे. धान्याचे पोत्याचे पोत्यासहित वजन ५० किलो ८०० ग्रॅम असावे, ई पॉस मशीन बदलून ४ जी कनेक्शन जोडावे, यांसह विविध मागण्यांचे निवेदन संघटनेचे तालुकाध्यक्ष महादेव कदम यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना देण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास १ मे पासून धान्य वितरण व्यवस्था बंद करू, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
कोरोना काळात भूकबळी होऊ नये म्हणून अविरत जिवाची पर्वा न करता धान्य वाटप केलेले आहे. तरीही शासनाकडून कोणताही प्रतिसाद अद्यापही मिळालेला नाही. राज्य सरकारकडून सकारात्मक चर्चा झाल्याशिवाय धान्य वितरण होणार नाही, या राज्य संघटनेच्या निर्णयाशी शिरोळ तालुका धान्य दुकानदार संघटना सहमत आहे. या मागण्यांप्रश्नी सकारात्मक निर्णय न झाल्यास १ मे पासून संपावर जाऊन सर्व धान्य व्यवस्था बंद करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. निवेदनाच्या प्रती तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे यांना देण्यात आल्या. निवेदनावर इम्तियाज पठाण, अबुबकर बारगीर, जितेंद्र गुप्ता, राजेंद्र घोडके, राजेंद्र कारंडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
फोटो - १६०४२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळ - जयसिंगपूर येथे रास्त भाव धान्य दुकानदारांच्यावतीने आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना निवेदन देण्यात आले.