कोल्हापूर : विविध विभागांशी संबंधित कोल्हापूरचे प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित आहेत. त्यासंबंधी निवेदने स्वीकारत आज, शुक्रवारी सहकार व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी या सर्व प्रश्नांची सखोल माहिती घेतली. हे प्रलंबित प्रश्न संबंधित विभागांकडे वर्ग करून लवकरात लवकर त्याचा निपटारा केला जाईल, अशी ग्वाही दिली. जनतेशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे.शासकीय विश्रामगृह येथे सकाळी अकरा वाजल्यापासून मंत्री पाटील यांनी नागरिकांची गाऱ्हाणी ऐकायला सुुरुवात केली. त्यामध्ये जिल्हा बँक, गोकुळ दूध संघ यासह विविध विभागाशी संबंधित प्रश्नांबाबत निवेदने देण्यात आली. रात्री आठपर्यंत मंत्री पाटील यांनी लोकांशी संवाद साधला. स्वीकारलेली निवेदने एकत्रित करून ती संबंधित विभागाला वर्ग केली जाणार आहेत. त्यानंतर ते प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यावर भर दिला जाणार आहे.दिलेल्या निवेदनांमध्ये, महाराष्ट्रातील साखर कामगारांच्या पगारवाढीबाबत संबंधित त्रिपक्ष कमिटी स्थापन करावे, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळातर्फे मंत्री पाटील यांना देण्यात आले. शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष विठ्ठल परबकर, सरचिटणीस शंकरराव भोसले, पंडित चव्हाण, श्रीकांत चव्हाण यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.सहकार न्यायालय क्रमांक १ व २ हे फौजदारी न्यायालयांच्या जागेमध्ये स्थलांतर करावे, तसेच कोल्हापूर येथे सहकार अपील न्यायालय, मुंबई यांचे कायमस्वरूपी बेंचसाठी जागा उपलब्ध करून मिळावी, या मागणीचे निवेदन कोल्हापूर डिस्ट्रिक्ट को-आॅपरेटिव्ह बार असोसिएशनतर्फे देण्यात आले. शिष्टमंडळात अध्यक्ष अॅड. इंद्रजित चव्हाण, सचिव अॅड. प्रबोध पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.महिन्याला २ हजार ५०० इतक्या अल्पवेतनात दिवस कंठावे लागत आहेत तसेच आमचे नोकरीत कायम करावे लागतात तितके आमचे दिवस भरले आहे तसेच औद्योगिक न्यायालयाचा कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करावे, असा आदेश झाला आहे. या विरुद्ध बँकेने याचिका दाखल केलेली आहे. त्यामुळे तारखांवर तारखा पडत आहेत तरी यामधून मार्ग काढून न्याय मिळावा या मागणीचे निवेदन कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्यावतीने यावेळी देण्यात आले.यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रामभाऊ चव्हाण, जिल्हा संघटनमंत्री बाबा देसाई, जिल्हा सरचिटणीस राहुल चिकोडे, विजय जाधव, नाथाजी पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)विविध विभागांशी संबंधित कोल्हापूरचे प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित आहेत. त्यासंबंधी निवेदने स्वीकारत शुक्रवारी शासकीय विश्रामगृह येथे सहकार व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी लोकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांशी चर्चा करताना मंत्री पाटील.
प्रलंबित प्रश्नांचा लवकरच निपटारा करणार
By admin | Published: November 22, 2014 12:35 AM