गांधीनगर : गांधीनगरमधील भाजी मंडईत असणाऱ्या समस्या तात्काळ सोडवा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्यावतीने गांधीनगरचे ग्रामविकास अधिकारी चंदन चव्हाण यांच्याकडे करण्यात आली. गांधीनगर येथील भाजी विक्रेत्यांना व्यवसाय करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. मंडईतील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आहे. भाजी मंडईत कचरा मोठ्या प्रमाणात साचला असून, त्याची सफाई व्यवस्थित केली जात नाही. तसेच भाजी मंडईत शेडची सुविधा नसल्याने ऊन-पावसात भाजी विकण्यासाठी विक्रेत्यांना व शेतकऱ्यांना बसावे लागते. उन्हात भाजी खराब होते, त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. हा त्रास दूर करण्यासाठी कायमस्वरूपी ग्रामपंचायतीने शेड उभारावे. भाजी मंडईत एका बाजूने गटारच नसल्याने सांडपाणी थेट भाजी मंडईत पसरत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून भाजी खराब होत आहे. भाजी मंडईत स्वच्छतागृह नसल्याने अनेक भाजी विक्रेत्या महिलांची कुचंबणा होत असल्याने तात्काळ स्वच्छतागृह उभारावे, अशी मागणीही यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना यांच्यावतीने करण्यात आली. यावेळी सुनील निरंकारी, वंदना संताजी, सुनील म्हात्रे, संग्राम कांबळे, छबुताई कराडकर, गीताबाई वायदंडे, उज्वला मिसाळ, श्रीकांत सावंत, राजू साठे आदी भाजीविक्रेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो: १४ गांधीनगर भाजी मंडई
ओळ-गांधीनगरमधील भाजी मंडईच्या समस्या तात्काळ सोडवा, या आशयाचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्यावतीने ग्रामपंचायत प्रशासनास देण्यात आले. यावेळी सुनील निरंकारी. ग्रा. वि. आ. चंदन चव्हाण व फळभाजी विक्रेते उपस्थित होते.