शिरोली :
भुदरगड तालुक्यातील वासनोलीपैकी जोगेवाडी येथील धनगर वाड्यावर जाणाऱ्या दोन किलोमीटर रस्त्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी २५ लाख रुपये निधी मंजूर केला आहे. तर, साधारण एक किलोमीटर अंतराच्या मार्गाला ३०० मीटर रुंदीने वनविभागाची मंजुरी मिळाली आहे.
यशवंत सेनेने हा रस्ता करावा, अशी मागणी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे केली होती. यशवंत सेनेच्या मागणीला यश आले आहे. धनगरवाड्यावर रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने येथील नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
२० दिवसांपूर्वी झालेल्या मोठ्या पावसात जोगेवाडी धनगरवाड्यात एका महिलेला प्रसूतीसाठी रस्ता नसल्याने डोलीतून घेऊन जात असताना डोलीतच प्रसूती झाली. याबाबत यशवंत सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी, पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना भेटून धनगरवाड्याला सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी लेखी मागणी राजेश तांबवे, योगेश हराळे, अमर पुजारी, ओंकार माने, सागर पुजारी, संदीप वळकुंजे, भीमराव वळकुंजे, तम्मा शिरोले, मैनाप्पा गावडे, गणपती सिद, चंद्रकांत वाळकुंजे, बाळासाहेब लांडगे यांनी केली होती. या मागणीची पालकमंत्री सतेज पाटील यांनी दखल घेऊन जोगेवाडी-धनगरवाडा रस्त्याला २५ लाखांचा निधी मंजूर केला आहे. एरंडपे, हंड्याचा वाडा या रस्त्यांसाठी ही मोजणी सुरू झाली आहे.