कागल : कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणूक सुरू असताना किरीट सोमय्या आमच्या साखर कारखान्याचा विषय घेऊन पुन्हा समोर येतात. हा निश्चितच योगायोग नाही. आमच्या कोल्हापूर व कागलमधील काही मित्रांच्या भूमिका तपासल्या, तर हा योगायोग आपल्या लक्षात येईल. जर या आमच्या मित्रांचे सीआरडी तपासले, तर सत्य समजेेल, अशी टीका ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोणाचे नाव न घेता केली. खोटे आरोप करून माझी बदनामी करण्याचा कितीही प्रयत्न करा, सर्वसामान्य जनता माझ्या पाठीशी असल्याने मला कोणाची भीती नाही, असेही ते म्हणाले.
करनूर (ता. कागल) येथे ग्रामपंचायतीच्यावतीने आयोजित सात कोटी रुपये खर्चून उभारलेल्या विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. माजी आमदार संजय घाटगे, युवराज पाटील, रमेश तोडकर, भैया माने, धनराज घाटगे, प्रवीण काळबर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री मुश्रीफ म्हणाले की, बारा वर्षांपूर्वी उभारलेल्या सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची उभारणी ऊस उत्पादक शेतकरी, सर्वसामान्य जनता यांच्या पैशातून केली आहे. कंपनी कायद्यानुसार सर्व व्यवहार केले आहेत. शपथपूर्वक सांगतो, भ्रष्टाचार अथवा मंत्रीपदाचा वापर करून यात पैसे घातलेले नाहीत. यापूर्वीही विविध यंत्रणांनी चौकशी, तपासण्या केल्या आहेत. पण त्यातून काहीच निष्पन्न झालेले नाही. तरी सुद्धा नाहक बदनामी हे लोक करीत आहेत.
मुश्रीफांसाठी रस्त्यावर उतरेन : संजय घाटगे
माजी आमदार संजय घाटगे म्हणाले की, मंत्री मुश्रीफ यांचे सामान्य जनतेसाठीचे काम बघून काहीजणांच्या पोटात दुखत आहे. ही घोडदौड अशीच राहिली, तर आपले कसे होणार? या चिंतेतून मंत्री मुश्रीफ यांना रोखण्याचा कुटिल प्रयत्न होत आहे. पण मंत्री मुश्रीफ हे लाखो लोकांना सावली देणारे रोपटे आहे. पीक खाणारे तण नाही. म्हणून मंत्री मुश्रीफ यांची जर कोणी कळ काढली, तर मी रस्त्यावर उतरेन.